आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:शेवाळा शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 1.90 लाख रुपयांसह 3 दुचाकी, 7 मोबाईल जप्त, सात जण पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा शिवारात सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी ता. 25 सायंकाळी सहा वाजता जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 1.90 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा शिवारातील एका शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांच्यासह पोलिस उपाधिक्षक कार्यालयाच्या पथकाने आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेवाळा शिवारातील शेतात छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांची पळताभुई झाली.

घटनास्थळावर असलेल्या 15 जणांपैकी आठ जण पळून गेले तर सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 1.90 लाख रुपये रोख, सात मोबॉईल व तीन दुचाकी जप्त केली आहे. या शिवाय घटनास्थळावर एक चारचाकी वाहन देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात रिंकूसिंग देवेंदरसिंग, गजानन माणिक मोरे, चंद्रकांत कोंडबा डुकरे, बाळासाहेब सोळंके, सुधाकर कदम, पंढरीनाथ पोपळाईतकर, देवानंद आनेराव यांच्यावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तर तीन दुचाकी कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष
दरम्यान, जिल्हयात अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु असून याकडे मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष होत आहे. गुन्हे शाखेकडून आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोप नागरीकांतून केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...