आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहरात शनिवार आणि रविवार कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशातच शनिवारी झालेल्या रेल्वे बोर्ड भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्र गाठणे विद्यार्थ्यांना खूप कठिण गेले. त्यातही ऑटो रिक्षा मिळत नाही आणि मिळाले तर थांबत नाही अशी अवस्था झाली. अशात मीनाक्षी नावाच्या एका तरुणीला वर्दीतला देव माणूस दिसून आला. परीक्षा केंद्र कसे गाठणार असा प्रश्न तिला पडला होता. सोबतच, बाजूला असलेला पोलिस बंदोबस्त पाहून ती घाबरून रडायलाच लागली. त्यात पोलिस शिपाई हनुमंत चाळनेवाड दादांनी आपल्याला मदत केल्याचे तिने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
औरंगाबादेत शनिवार आणि रविवार पूर्णपणे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये मात्र नियोजित असलेल्या परीक्षांना सवलत देण्यात आली आहे. शनिवारी रेल्वे भर्ती बोर्डच्या वतीने विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी बुलडाणा, शेगाव, जालना, हिंगोली, परभणी येथून विद्यार्थी आले होते. 2019 मध्ये अर्ज प्रक्रिया झालेल्या या परीक्षा दोन वर्षानंतर होत असल्याने कुणी खासगी वाहनाने तर कुणी एसटी बसने औरंगाबादेत परीक्षेसाठी आले. हॉल तिकीटावर देण्यात आलेला पत्ता गुगलमॅपवर दुसरेच ठिकाण दाखवत असल्याने काही विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. एकतर दोन वर्षानंतर परीक्षा होते आहे. त्यात कोरोना आणि लॉकडाउनच्या बहाण्याने ऑटो-रिक्षा चालक सुद्धा दीडशे ते दोनशे रुपयांशिवाय बोलत नव्हते. त्यापैकी एक मूळची बुलडाणाची असलेली मीनाक्षी परीक्षा देण्यासाठी वाहन शोधत होती.
रेल्वे बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाण्याकरिता वाहनाची वाट पाहणाऱ्या मीनाक्षी धंदर या विद्यार्थीनीला वाहनच मिळेना. औरंगपुरा बसस्टॉपवर येणारे जाणारेही कुणीच दिसत नव्हते. त्यात आस-पास पोलिस बंदोबस्तात तिला काय करावे काहीच कळत नव्हते. एक-एक सेकंद तिच्यासाठी महत्वाचा होता. परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर झाला तर काय होईल अशी भीती तिच्या मनात होती. एवढे सगळे विचार करून तिला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यानंतर जवळच असलेल्या एका पोलिसाने तिची विचारपूस केली. त्यावर रडता-रडताच तिने परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहनच मिळत नसल्याची कैफियत मांडली. तिच्या या बोलण्यावर वर्दीतली माणसं पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, एस.एस. पुरी, आर.के. वाणी, हनुमंत चाळनेवाड यांनी तिला धीर दिला. तसेच हनुमंत चाळनेवाड स्वतः तिला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. तसेच तिला परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. आज त्या पोलिस दादांमुळेच आपण परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकलो असे सांगताना मीनाक्षीच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे दिसत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.