आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकतर्फी प्रेम करणाऱ्या मैत्रिणीशी विवाह हाेऊ न शकल्याने एका प्रियकराने तिच्या विवाहानंतर पाच वर्षांनी मैत्रिणीची अश्लील छायाचित्रे साेशल मीडियावर पाेस्ट केली. याप्रकरणी विवाहित तरुणीने तक्रार दाखल करताच औरंगाबाद पोलिसांच्या सायबर पथकाने २४ तासांत आरोपीला अटक केली. इतकेच नव्हे तर आराेपी पोलिस कोठडीतून बाहेर येईपर्यंत म्हणजे पाचच दिवसांत त्याच्याविराेधात ९८ पानांचे दाेषाराेपपत्रही न्यायालयात दाखल केले. नूतन पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्परतेने कारवाईचे आदेश दिल्यामुळे आैरंगाबादेत प्रथमच इतक्या वेगाने हालचाली झाल्याचे दिसून आले. जालन्यातील एका २५ वर्षीय युवतीची खासगी बँकेतील कर्मचारी संतोष शेषराव डिघोळे (३०, रा. पिंपळगाव, जि. जालना) याच्यासोबत ओळख होती. संताेष मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र या युवतीने संताेषसाेबत लग्नास नकार देऊन पाच वर्षांपूर्वी दुसऱ्याच मुलाशी लग्न केले. तिला मुलगीही झाली. चार वर्षांपूर्वी संताेषचेही लग्न झाले. मात्र मैत्रिणीवरचा राग त्याच्या मनात हाेताच. त्याने तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे सुरू केले. ऑक्टोबर महिन्यात संताेषने तिच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते काढले व त्यावर तिची आक्षेपार्ह छायाचित्रे एडिट करुन टाकली. तसेच तिचा फाेन नंबरही पाेस्ट केला. त्याचा सदर तरुणीला खूप त्रास झाला. त्यामुळे सदर पीडितेने सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षिका गीता बागवडे यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ शाेध घेत २४ तासांत संतोषला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान सायबर पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून कोठडी संपण्याच्या दिवशीच आराेपीविराेधात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे संतोषने यापूर्वीही पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मे महिन्यात त्याच्याविराेधात शेवले पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली हाेती. मात्र ताे जामिनावर बाहेर आला अन् पुन्हा सोशल मीडियावर तिची बदनामी सुरू केली.
असा घडला क्रम
७ ऑक्टोबर रोजी आराेपीविराेधात औरंगाबाद सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
८ ऑक्टोबर रोजी संतोषला पिंपळगावातून अटक
९ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने पाच दिवसांची काेठडी सुनावली.
१३ ऑक्टोबर रोजी काेठडी संपताच पोलिसांनी ९८ पानांचे दोषारोपपत्र दाखल केेले.
फास्ट ट्रॅकमुळे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल
महिला अत्याचाराविराेधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड म्हणाल्या, दोन वर्षांपूर्वी बुलडाण्यात परराज्यातील नोकरदार मुलींचा विनयभंग झाला हाेता. तेथील पोलिसांनी २४ तासांत दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयानेही १० दिवसांत शिक्षा ठोठावली. औरंगाबाद पोलिसांची तत्परता स्वागतार्ह आहे. दाेषाराेपपत्रास वेळ लागला तर पीडिता जास्त भरडली जाते. यामुळे लाेकांचा पोलिस, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.