आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोस्ट कोविडमध्ये हातापायांवरही होतोय दुष्परिणाम; हातापायाला सूज, उबदारपणा जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हातापायांचे दुखणे अंगावर काढू नका - डॉ. अमोल लाहोटी, रक्तवाहिनी विकारतज्ञ

कोरोना बरा झाल्यानंतर (पोस्ट कोविड) मधुमेह, रक्तदाब, दमा आणि इतर आजार असणाऱ्यांना धोका आहेच. मात्र, आता कोरोनानंतर हातापायामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. यावर वेळीच उपचार केले नाही तर पायातील रक्ताची गुठळी हलून व ती फुप्फुसापर्यंत जाऊन संसर्ग वाढून रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे हातापायावर सूज, प्रचंड वेदना, लालसर डाग पडणे, पायात उबदारपणा जाणवणे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असे रक्तवाहिनी विकारतज्ञ डॉ. अमोल लाहोटी यांनी दिव्य मराठीला सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतील स्ट्रेन अतिशय घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना झाल्यानंतरही अनेक रुग्णांना इतर आजारांनी घेरल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत डॉ. लाहोटी म्हणाले की, कोरोना हा मुख्यतः श्वसन, फुप्फुससंबंधित आजार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण हे खूप वाढले आहे. तसेच हात आणि पायामध्येदेखील रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही गुठळी एका जागून हलून फुप्फुसापर्यंत जाऊ शकते.

त्यामुळे संक्रमण वेगाने वाढून रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. जागतिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोरोना रुग्णांमध्ये डीप व्हेन थ्रॉम्बाॅसिस या प्रकारच्या रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे प्रमाण १ ते २ टक्के आहे. मात्र, भारतामध्ये हे प्रमाण सुमारे ८ ते २० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे या गुठळ्या हात आणि पायामध्ये होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

रक्त जाळ्यावर होतो परिणाम
सुरुवातीच्या संशोधनामध्ये कोरोना हा केवळ फुप्फुसावर परिणाम करत असल्याचे समोर आले. त्यानंतर न्यूमोनिया होतो, असेही संशोधन झाले. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना फक्त श्वसन, फुप्फुस यावरच परिणाम करत नाही तर रक्ताभिसरण संस्था, यकृत, मेंदू, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवरदेखील परिणाम करतो. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यावर नियमित व्यायाम किंवा २० मिनिटे पायी चालल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते.

अशी होते रक्ताची गुठळी तयार
कोरोना झाल्यानंतर ७ ते ८ दिवसांनंतर रक्ताच्या गुठळ्या शरीरात विकसित होतात. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रक्ताचे जाळे अधिक प्रमाणात वाढत असते. त्यानंतर रक्ताची गुठळी तयार होते. तसेच रक्तवाहिन्या पेशीवर विषाणूंमुळे जळजळ होते. थ्रोबिनचेही अधिक जाळे तयार होते.

हातापायांचे दुखणे अंगावर काढू नका
पोस्ट कोविडमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी होते. ज्यांची प्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे, अशांच्या हातापायांच्या शुद्ध रक्तवाहिन्या बंद होतात. हातपाय थंड पडून गँगरीन होण्याची भीती असते. दुखणे अंगावर काढून अनेक रुग्ण हे उशिरा रुगणालयात येतात. त्यामुळे हातपाय काळे पडतात, मोठी जखमही होते. पोटाच्या आतड्यांच्या रक्तवाहिन्यांना धोका असतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवावे.- डॉ. अमोल लाहोटी, रक्तवाहिनी विकारतज्ञ

बातम्या आणखी आहेत...