आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूजीसीचे निर्देश आहेत की, 90 दिवसांच्या शिकवणी शिवाय परीक्षा घेऊ नयेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (पीजी) परीक्षांचे वेळापत्रक 73 दिवसांनीच जाहीर केले आहे. 22 डिसेंबरपासूनचे वेळापत्रक आहे. 110 परीक्षा केंद्रांवरून 16 हजार 913 विद्यार्थी पीजीची परीक्षा देतील.
यंदा पदवी स्तरावरील निकालाला विलंब झाल्यामुळे विद्यापीठाच्या पीजी प्रवेशाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. ९ जुलै आधीच प्रवेश होतील, असे गृहित धरून विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकात ९ जुलै ते १९ ऑक्टोबरपर्यंत (९० दिवस) शिकवणी पूर्ण होईल, असे नमूद आहे. त्यानंतर ४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला इतक्या वेळा मुदतवाढ देण्यात आली की, १९ सप्टेंबरला स्पॉट अॅडमिशन दिले गेले. तेव्हापासून जर ‘इफेक्टिव्ह टीचिंग पिरियड’ गृहित धरला तर २१ डिसेंबरपर्यंत ७३ दिवसच होतात. ७४ व्या दिवसापासून पीजीच्या १६,१९३ विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ घेतली जाणार आहे. बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम प्रथम सत्राच्या परीक्षाही २२ डिसेंबरपासूनच सुरू होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ५ दरम्यान अशा दोन सत्रांत पेपर होतील. व्यावसायिक पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल.
सार्वजनिक सुट्यांतच गेले १९ दिवस
१९ सप्टेंबरच्या ‘स्पॉट’ नंतर २० सप्टेंबरपासून शिकवणीला सुरूवात झाली असे म्हटले तर सप्टेंबर महिन्यात ११ दिवसांचीच शिकवणी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या १० दिवसांपेक्षा अधिक सुट्या होत्या. त्यामुळे या महिन्यात फक्त १९ दिवसांची शिकवणी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये गुरूनानक जयंतीसह चार रविवार होते. त्यामुळे या महिन्यात २५ दिवस क्लासेस झाले. डिसेंबरचे तीन रविवार वगळले तर १८ दिवसच क्लासेस होतात. या ‘वर्किंग डेज’ची बेरीज केली तर ७३ दिवसांचीच प्रत्यक्ष शिकवणी होते आहे.
सर्वाधिक परीक्षार्थी विज्ञानचे
सर्वांधिक ९, ८०२ विद्यार्थी विज्ञान शाखेतून म्हणजेच एम.एस्सी.ची परीक्षा देणार आहेत. कला व सामाजिकशास्त्र शाखेतून एम.ए.ची ३, ८२५ विद्यार्थी परीक्षा देतील. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील एमकॉमची परीक्षा ३,२८६ जण परीक्षा देणार आहेत. ४ जिल्हयात कॉपीसह विविध गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी १० भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
आमच्या रेकॉर्डनुसार ९० दिवस झालेत
वास्तविक पाहता यूजीसीने पूर्ण वर्षभराची शिकवणी १८० दिवसांची व्हावे असे म्हटले आहे. त्यामुळे प्रथम सत्राचे ९० दिवस पूर्ण झालेच पाहिजे असे नाही. तरीही आमच्याकडील माहितीनुसार ९० दिवसांची शिकवणी पूर्ण झाली आहे. त्यामुळेच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे-डॉ. श्याम शिरसाट, प्र-कुलगुरू
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.