आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:कोरड्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांना स्थगिती

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • जलसंपदा विभागाने मागवल्या होत्या दुरुस्तीसाठी निविदा

जलसंपदा खात्याच्या अनावश्यक सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी शनिवारी चाप लावला. गेल्या महिन्यात विभागाने उपयोगी नसणाऱ्या कोरड्या प्रकल्पांच्या दुरुस्तीची जाहिरात काढली हाेती, तर दुसरीकडे सतत भरणाऱ्या पण गळती आणि भिंतींना तडे गेलेल्या धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. ही बाब ‘दिव्य मराठी’ने मांडल्यानंतर शनिवारी (११ एप्रिल) जाहिरात दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली.  

जलसंपदा खात्याने १३ मार्च रोजी २०१९-२० साठी सांजूळ, बाबूळगाव, गिरिजा व जातेगाव प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामांची जाहिरात काढली. सांजूळ प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प कधीही भरलेले नाहीत. ते शेतकऱ्यांच्या किंवा पाणीपट्टी मिळत नसल्याने शासनाच्याही फायद्याचे नाहीत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने  २७ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले. ‘दिव्य मराठी’ने  स्वत: पाहणी करून काठोकाठ भरलेल्या व दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या टाकळी लघु प्रकल्प, साेबलगाव लघु प्रकल्प, गंधेश्वर लघु प्रकल्प, नागनाथ कोप लघु प्रकल्प, आळंद लघु प्रकल्प, सांजूळ  आणि गिरसावळी लघु प्रकल्पांची दुरुस्ती गरजेची असल्याचे या वृत्तात मांडले. त्याची दखल घेत महामंडळाचे कार्यकारी संचालक एन.व्ही.शिंदे यांनी सर्व कामांना स्थगिती दिली आहे.

सर्व कामांना स्थगिती

या प्रकरणी माहिती घेतली आहे. अधीक्षक अभियंत्यांना जाहिरातीतील धरणांची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर सध्या तरी जाहिरात काढलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणतेही काम करू नये, असे आदेश आज जारी केले. - एन.व्ही. शिंदे, संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ

बातम्या आणखी आहेत...