आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या सुधारित यादीला स्थगिती, एमपीएससीत ‘एसईबीसीं’ना ईडब्ल्यूएसमधून संधीला आव्हान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या सुधारित यादीला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. साधना जाधव व न्या. सुरेंद्र तावडे यांनी स्थगिती दिली आहे. या भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’ उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गाचा लाभ देण्याचा शासनाने जाे निर्णय घेतला आहे त्याला आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी १२ ऑगस्ट राेजी हाेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्य शासनाने मराठा (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गाचा (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा धोरणात्मक निर्णय ३१ मे २०२१ रोजी घेतला होता. हा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या प्रलंबित भरती प्रक्रियेला पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटक श्रेणीतून निवड झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, अॅड. सय्यद तौसिफ यासीन यांनी बाजू मांडली.

राज्य लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवांच्या एका प्रकरणात सुधारित निवड यादी प्रकाशित केली आहे. तीत पूर्वी ईडब्ल्यूएस श्रेणीतून निवड झालेल्या उमेदवारांची नावे वगळण्यात आली आहेत. याला आव्हान देत एमपीएससी, एमएसईडीसीएल आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ नाेकर भरती प्रक्रियेत रितसर निवड झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. त्यावर न्यायालयाने राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ११४५ पदांच्या सुधारित यादीस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...