आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे औरंगाबादेत करणार शक्तिप्रदर्शन:समर्थक आमदारांना बळ देण्यासाठी वैजापूर, सिल्लोडमध्ये दाखवणार ताकद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेत बंड करणारे नेते एकनाथ शिंदे यांना पक्षातील ४० आमदारांनी साथ दिली, त्यात सर्वाधिक पाच आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आता शिंदेंनी या आमदारांना पाठबळ देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठीच शनिवारी व रविवारी (३० व ३१ जुलै) शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पाचही बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार शिंदे गटात सामील झाले. त्याचा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना बसला. या आमदारांसोबत त्यांचे अनेक समर्थकही शिंदेंच्या गोटात जात आहेत. ही पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मागील आठवड्यात शहरात मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. यातून सामान्य शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत असल्याचा संदेश देण्यात स्थानिक नेते यशस्वी झाले. मात्र हाच समज खोडून काढण्यासाठी आदित्य यांच्यापेक्षाही मोठे शक्तिप्रदर्शन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन बंडखोर आमदारांनी केले आहे. शिंदेंच्या या दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होऊ शकतो, काहींना नवीन जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात.

मनपासाठी भाजपशी युती : जंजाळ
मनपा निवडणूक आम्ही भाजपशी युती करूनच लढवणार आहोत, अशी माहिती शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे या दौऱ्यात आमदार अतुल सावेंच्या घरी जाणार आहेत, यातून स्पष्टपणे युतीचे संकेत दिले जाणार असल्याचे दिसते. दरम्यान, ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी- काँग्रेसशी युती करून ठाकरे समर्थक शिवसैनिक निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अनेक नाराज माजी नगरसेवक, पदाधिकारी आमच्यासोबत येणार असल्याचा दावाही जंजाळ यांनी केला.

खैरेंच्या इशाऱ्याकडे लक्ष
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर (२७ जुलै) शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यात दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ठाकरे समर्थक शिवसैनिक काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात उपस्थित असलेले जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर दोनच दिवसांनी शिंदे गटात गेल्याची चर्चा सुरू झाली.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा
३० जुलै रोजी दुपारी ५ वाजता नाशिक जिल्ह्यातून वैजापुरात आगमन. तेथे आ. रमेश बोरनारे यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. त्यानंतर औरंगाबादेत मुक्काम.
३१ जुलै : सकाळी १० वाजता विभागीय आयुक्तालयात बैठक
११.३० वाजता पत्रकार परिषद
१२.३० वाजता सिल्लोडकडे रवाना. आ. अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी. जाहीर सभा.
सायं. ६ वाजता औरंगाबादेत आगमन.
सायं. ७.४० आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या संपर्क कार्यालयाला भेट. वाहन रॅलीला हिरवी झेंडी दाखवणार.
रात्री ८ क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन.
आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाला भेट.
सूतगिरणी चौकातील आमदार संदिपान भुमरे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट.
भाजप आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी भेट. नंतर शहरात मुक्काम

बातम्या आणखी आहेत...