आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा:एलिटवर मात करत प्रदिप स्पोर्ट्स विजयी, अर्जुन राजपूत ठरला सामनावीर

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप स्पोर्ट्स संघाने झालानी टुल्स मैदानावर सुरु असलेल्या पीएस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवला. बुधवारी झालेल्या लढतीत प्रदिपने एलिट स्पोर्टस संघावर 3 गड्यांनी मात केली. सामन्यात अर्जुन राजपूत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एलिट संघाने 20 षटकांत 6 बाद 114 धावा उभारल्या. यात कृष्णा पवारने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र त्याचे हे अर्धशतक संघ पराभूत झाल्याने व्यर्थ ठरले. त्याने 46 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचत 55 धावांची खेळी केली. त्यापूर्वी सलामीवीर मयुर चौधरी अवघ्या 4 धावांवर परतला. सलामीवीर निकित चौधरीने 15 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 24 धावा जोडल्या. त्यानंतर आलेले सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. निखिल कदम (4), ओंकार सुर्वे (1), अतुल वालेकर (2), अजिंक्य पाथ्रिकर (9) धावा करु शकला. अक्षय देवळे 8 धावांवर नाबाद राहिला. प्रदिपकडून मधुश जोशीने 14 धावांत 3 आणि अर्जुन राजपूतने 21 धावा देत 3 गडी बाद केले.

संघर्षानंतर प्रदिप संघ जिंकला

प्रत्युत्तरात प्रदिप स्पोर्ट्सला विजयासाठी संघर्ष करावा लागला. प्रदिपने 19.4 षटकांत 7 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर ओम जाधवने 19 धावा केल्या. प्रितेश (1) व सचिन लव्हेरा (2) आल्यापावली परतले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अविनाश मुकेने 30 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 33 धावा काढल्या. अतुल वालेकरने मंगेश निटूरकरच्या हाती त्याला झेल बाद करत अडथळा दुर केला. हरिओम काळेने 12 धावा जोडल्या. युवराज चव्हाणने 11 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद 22 धावांची विजयी खेळी केली. सलीम पठाण 10 धावांवर नाबाद राहिला.एलिटकडून अजिंक्य पाथ्रिकरने 3 आणि अतुल वालेकरने 2 गडी बाद केले. मंगेश निटूरकरने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...