आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दोन कोटींचा गंडा घालणारा प्रशांत धुमाळ पुण्यात जेरबंद; ​​​​​​​गुंतवणुकीचे आमिष दाखवून शहरातील अनेकांना गंडा

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्चभ्रू राहणीमान, मर्सिडीझचा वापर

कमोडिटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २०१९ मध्ये शहरातील शहरातील ३० पेक्षा अधिक लाेकांना दाेन काेटी रुपयांचा गंडा घालणारा प्रशांत रमेश धुमाळ (४७) हा दोन वर्षांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. ताे पुण्यातील वाघोली येथे भाच्याकडे असल्याचे कळताच ८ जून रोजी त्याला अटक करण्यात अाली. सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को. ऑप सोसायटीत व्यवस्थापक असलेल्या अनिलकुमार जैस्वाल (३०, रा. जाधववाडी) यांची प्रशांतसोबत जानेवारी २०१४ मध्ये पडेगावातील एका आश्रमात ओळख झाली होती. त्यानंतर सीटीए (कमोडिटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा तसेच महिन्याला दहा टक्के व्याज देण्याचे आमिष प्रशांत व त्याच्या पत्नीने जैस्वाल यांना दाखवले.

त्याच्यावर विश्वास ठेवून १ मार्च २०१४ रोजी जैस्वाल यांनी सीटीए व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही दिवस प्रशांतने त्यांना ३५ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे जैस्वाल यांनी आणखी सात लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र प्रशांतने आयकर विभागाचा ससेमिरा, बँकेच्या खात्यात पैसे नाही, खात्याचे व्यवहार बंद झाले, अशी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

प्रशांतने ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली. त्यावरून प्रशांतची पत्नी भावना, भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अविनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पूर्णपात्रे यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर शहरातील अनेक लोक तक्रार देण्यासाठी पुढे आले. त्यांनाही प्रशांतने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. काही दिवस व्याजाचे पैसे देवून नंतर टाळाटाळ करू लागला. दरम्यान, लोकांकडून लुबाडलेले पैसे त्याने पुण्यासह अन्य शहरात कोठे गुंतवले आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

उच्चभ्रू राहणीमान, मर्सिडीझचा वापर
औरंगाबादमध्ये प्रशांतने अनेकांना गंडा घातल्यानंतर पुण्यात शेअर मार्केट, कमोडिटीसारखा गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला. मर्सिडीझसारख्या अालिशान गाड्या वापरायचा. राहायचे ठिकाण सतत बदलत असे. त्याचे राहणीमान उच्चभ्रू हाेते, असे पोलिसांनी सांगितले.

७ लाख ते १ कोटी ८५ लाख
गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल सातोदकर तपास करत होते. नंतर सात लाखांच्या फसवणुकीच्या तपासात आकडा तब्बल १ कोटी ८५ लाखांपर्यंत गेला. तक्रारदारदेखील वाढले. प्रशांतचा घोटाळा सिद्ध होताच जानेवारी २०२१ मध्ये पथकाने त्याचा पुण्यात शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. काही दिवसांनी सहायक निरीक्षक सातोदकर यांना तो वाघाेलीत भाच्याच्या घरात लपल्याचे कळाले. निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातोदकर, अंमलदार नितीश घोडके, संदीप जाधव, महेश उगले, बाबासहेब भानुसे व नितीन देशमुख यांनी दोन दिवस त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर ८ जून रोजी घराबाहेर पडताच त्याला पथकाने ताब्यात घेत औरंगाबादमध्ये आणले.

बातम्या आणखी आहेत...