आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षीपासून मार्च ते जून या कालावधीत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानअंतर्गत ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला होता. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे एप्रिल व जून महिन्यात शाळापूर्व तयारी अभियान राबविले जाणार आहे. पहिलीत येणाऱ्या मुलांचे पाऊल महत्त्वपूर्ण ठरण्यासाठी शाळानिहाय माता-पालक गट तयार करण्याबाबत शिक्षण विभागाने शाळांना सूचित केले आहे.
ज्या बालकांची शाळापूर्व तयारी झालेली असते, अशा बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. यासाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी शाळानिहाय माता पालक गट तयार करणे, अभ्यासक्रम, मूल्यमापन प्रक्रिया अशा बाबींवर विचारमंथन सुरू आहे. आराखडा तयार झाल्यानंतर पूर्वतयारीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
शाळास्तरावर सूचना
जिल्ह्यातील जिप, मनपा, नपाच्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन केले जाणार आहे. मेळाव्यात इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके, त्यांचे पालक सहभागी होतील. याकरिता वस्ती, गावस्तरावर प्रभात फेरी, दवंडी देऊन, समाजमाध्यमांचा उपयोग करून जनजागृती करण्यात येईल. शाळास्तरावरील मेळाव्यासाठी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून येणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
३० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
मुलांमध्ये शाळा, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचे मूल्यांकनही होते. २०२२-२३ शैक्षणिक वर्षात शाळापूर्व तयारी उपक्रमात जिल्ह्यात १२०० हून अधिक शाळांमधून ५ हजार १८२ माता पालक गट निश्चित करण्यात आले होते. याद्वारे ३३ हजाराहून अधिक मुलांना यात सहभागी करून घेण्यात आले होते.
यंदा सुरुवातीला पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल. ज्यात प्रामुख्याने ३ हजार २३७ अंगणवाड्यांमधील २ लाख ६१ हजार ९४८ बालकांमधून जे पहिलीच्या वर्गासाठी पात्र असतील त्यांची संख्या निश्चित करण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.