आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेज प्रवेश:विज्ञान शाखेला पसंती, अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

अकरावी प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पहिली पसंती दिली असून तब्बल आठ हजार ५३० विद्यार्थ्यांनी या शाखेसाठी नोंदणी केली आहे. तर विद्यार्थ्यांनी दुसरी पसंती वाणिज्य शाखेला दिली आहे. केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने मंगळवारी गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यातून ही माहिती समोर आल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले . आत्तापर्यंत प्रवेशासाठी एकूण २३ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून १७ हजार ६२१ उमेदवारांनी पर्यायांची निवड केली आहे.

कोरोनामुळे अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेस विलंब झाला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोंदणी करुन अर्जाचा भाग एक भरुन पडताळणी करणे, तसेच महाविद्यालय व शाखा निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पुर्ण करायची आहे. आतापर्यंत २३ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १७ हजार ६२१ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आले असून १७ हजार ३५४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच १४ हजार २७३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमांचे पर्याय भरले आहेत.

समितीच्या वतीने औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा दहावीच्या कल चाचणीत गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांचा कल हा कला आणि ललित कला शाखेकडे असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद मनपा परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जातील भाग दोन भरण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.२५)ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तर कोटा प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी उद्या बुधवारपर्यंत (दि. २६) मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. अकरावी प्रवेशातील इनहाउस कोट्यातील प्रवेश संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयांनी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser