आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा फायदा होत असून आणखी सुधारणेसाठी ढोरकीन येथील पंपहाऊसवर दोनशे एचपीचा एक पंप बसवला जाणार आहे. यामुळे चार एमएलडी (दशलक्ष लिटर) आवक वाढेल. लवकरच या कामाला सुरुवात होईल. पोलिस बंदोबस्त मिळाल्यास जलकुंभांकडे पाणी आणणाऱ्या मुख्य वाहिन्यांवरील १८०० बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम २८ जूनपासून सुरू होऊ शकते.
पाणीटंचाई संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ते आठवड्यातून तीन ते चार बैठकांतून पाणीपुरवठ्याचा आढावा घेत आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या पाणीपुरवठा आणि तांत्रिक विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांच्या सूचनेवरून जुन्या ५६ एमएलडी क्षमतेच्या योजनेचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासोबतच जुन्या योजनेतून पाणीवाढ करण्यासाठी नियोजन केले जात आहे.
या संदर्भात माहिती देताना मनपाच्या तांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित म्हणाले की, जुन्या ५६ एमएलडी क्षमतेच्या योजनेतून सध्या ३५ एमएलडी पाणी येत आहे. या योजनेतून ४२ एमएलडीपर्यंत आवक वाढवावी, असे केंद्रेकरांनी सांगितले. त्यामुळे पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली ढोरकीन पंपहाऊसवर आणखी एक पंप वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०० एचपीच्या पंपाने चार एमएलडी पाणी वाढेल, असे पंडित यांचे म्हणणे आहे.
त्या नळांना २४ तास पाणी
शहरात सध्या ३१ जलकुंभांवरून पाण्याचे वितरण केले जाते. हे कुंभ भरणाऱ्या मुख्य पाइपलाइनवर नागरिक, व्यावसायिकांनी बेकायदा नळ घेतले आहेत. त्यामुळे टाक्या भरत नाहीत. विशेष म्हणजे बेकायदा नळ घेणाऱ्यांना २४ तास पाणी मिळत होते. अशा नळांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. त्यानंतर मनपाने नऊ प्रभागात मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळांचा शोध घेतला व १६६३ ते १८५५ बेकायदा नळ मुख्य लाइनवर असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त संतोष टेंगळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
पोलिस बंदोबस्त मिळाल्यास मोहीम
जलकुंभांकडे पाणी आणणाऱ्या वाहिन्यांवरील बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम पोलिस बंदोबस्त मिळाल्यास मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मेन लाइनवरील कनेक्शनची पाहणी केली असता १६६३ ते १८५५ बेकायदा नळ मुख्य लाइनवर असल्याचे समोर आले आहे. ते तोडताना विरोध केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
गुन्हे दाखल करणार
मुख्य पाइपलाइनवरील बेकायदा नळ तोडून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. बेकायदा नळ तोडण्यासाठी विरोध होत असल्याने पोलिस बंदोबस्तासाठी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारपासून बंदोबस्त मिळण्याची शक्यता असून त्यानंतर कारवाई सुरू होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.