आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी वाटाघाटी:उद्धवसेना-वंचित बहुजन युतीची तयारी; पहिला प्रयोग मुंबई, औरंगाबाद मनपात, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा पुढाकार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवशक्ती-भीमशक्तीचा पहिला प्रयोग झाला. रिपाइं आठवले गट शिवसेना-भाजपसोबत आला आणि पुढे भाजपकडे गेला. आता उद्धवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची तयारी सुरू आहे. वंचितचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तसे पत्रही उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात त्याची घोषणा होऊ शकते. या नव्या युतीचा पहिला प्रयोग मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे मुंबईमध्ये 40 तर औरंगाबादमध्ये 9 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा दावा केला जात आहे.

युतीच्या प्रक्रियेसाठी औरंगाबादेत प्राथमिक स्वरूपाच्या तीन बैठका झाल्या. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, एमआयएम आणि वंचित आता एकत्र येणार नाहीत. त्यामुळे वंचितला नव्या सहकाऱ्याची गरज आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनाही रिपाइं आठवले गटाला पर्याय हवा आहे. हे लक्षात आल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काही ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

राष्ट्रवादीची मुख्य अडचण
उद्धवसेना सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच संभाजी ब्रिगेडसोबत आहे. त्यात वंचितची भर टाकण्याला काँग्रेस किंवा संभाजी ब्रिगेडचा विरोध राहणार नाही. मात्र, राष्ट्रवादीची मुख्य अडचण आहे. काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोबत घेण्याची घोषणा केल्यावर वंचित ऐनवेळी दुसरीकडे जाऊ शकते, असाही राष्ट्रवादीचा सूर आहे.

विधानसभेतही फायदा होईल
उद्धवसेना महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करायची असेल तर वंचित बहुजनशी युती महत्त्वाची आहे. नऊ प्रभागांमध्ये दोघांना एकमेकांचा फायदा शकतो. विधानसभेत औरंगाबाद मध्य मतदारसंघातही उद्धवसेनेला फायदा होऊ शकतो. येथे वंचितची मते ज्यांच्या बाजूने झुकतील. त्यांचा उमेदवार विजयी होईल.

नव्या समीकरणाची प्रतीक्षा

वंचित बहुजन आघाडीचे माजी सचिव गौतम लांडगे म्हणाले की, जून महिन्यातील सत्तांतर, सर्वच पक्षांच्या मतदारांची फाटाफूट लक्षात घेता राज्याला नव्या समीकरणांची प्रतीक्षा आहेच. वंचित आणि उद्धवसेना यांच्यात प्राथमिक बोलणी झाली आहेत. महिनाभरात तशी घोषणा होऊ शकते. मुंबई महापालिकेत किमान 40 वॉर्डांमध्ये ही युती परिणाम करू शकते.

प्राथमिक सर्वेक्षणात असे चित्र

वंचित बहुजन आणि उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद, मुंबईमध्ये प्राथमिक सर्वेक्षण केले. तेव्हा औरंगाबादमधील नऊ प्रभागांमध्ये वंचित आणि उद्धवसेनेची मते एकमेकांना मिळाली तर उमेदवार विजयी होऊ शकतात. मुंबईमध्ये 40 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचा असाच फायदा होऊ शकतो. सत्ताही मिळवता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...