आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांनी राज्यपालांची हकालपट्टी करावी:थोर महापुरुषांबद्दल सातत्याने चुकीचे विधान; मराठा संघटना आक्रमक

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा चुकीचे विधान केले आहे. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

तीव्र शब्दांत निषेध नोंदवून सातत्याने थोर महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या राज्यपालांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हक्कालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा निर्वाणीचा इशारा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे आदींनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड समाजाचे आराध्य दैवत आहेत. तर छत्रपती शाहु महाराज, शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारावर संपूर्ण महाराष्ट्र चालतो. देश आणि जागतिक पातळीवर त्यांचे विचार आत्मसात केले जातात.शालेय विद्यार्थ्यांना शिकवण दिली जाते. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना याचा विसर पडला असून ते सातत्याने चुकीचे विधान करून जनतेचा रोष ओढवून घेत आहेत. 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी विद्यापीठातील डीलेट पदवी समारंभ कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केले आहे. यामुळे औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांचे चुकीचे विधाने बघून त्यांना महाराष्ट्रातून हटवावे, अशी आग्रही मागणी सर्वस्तरातून होत आहे.

आऊट डेटेड झालेल्या राज्यपालांना हटवा

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज काल, आज आणि उद्याही सर्वांचेच श्रद्धास्थान राहातील. त्यांच्या विषयी सातत्याने चुकीचे विधान करणाऱ्या आऊटडेटेड झालेल्या राज्यपालांना त्वरीत हटवण्यात यावे. त्यांच्या चुका पाठीशी घालण्याच्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात उद्रेक होण्यापूर्वी तातडीने पाऊल उचलावे.

छत्रपती शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे

जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट आणि लोककल्याणकारी असं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. त्यांच्या आदर्शातूनच जागतिक लोकशाहीची बीज रोवली गेली. त्यांच्या आदर्शातूनच भारतीय संविधानासह अनेक देशाचे संविधान निर्माण झालेले आहे. त्यांनी विविध क्षेत्रात मानदंड निर्माण केले.

आदर्श निर्माण केले. त्यांचा इतिहास म्हणजे केवळ ढाल तलवारीचा इतिहास नसून तो परिवर्तनाचा आणि जगाला हजारो वर्षे आदर्श देणारा सर्वोत्कृष्ट असा इतिहास आहे. त्यामुळे गडकरीच काय तर कुणाचीही तुलना त्यांच्याशी होऊच शकत नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे जाणीवपूर्वक वारंवार वादग्रस्त विधान करीत असतात.आज त्यांनी जे विधान केलेल आहे. ते जाणीवपूर्वक विकृत मानसिकतेथून खोडसाळपणे केलेल आहे. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.

बातम्या आणखी आहेत...