आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी आरटीओने सुरू केलेल्या कारवाईविराेधात १ डिसेंबरला शहरातील रिक्षा संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे भल्या पहाटेपासून धावणाऱ्या रिक्षा रस्त्यावरून दिसेनाशा झाल्या. रेल्वेस्थानक, बसस्थानकात तुरळक रिक्षा हाेत्या. शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे पालकांनी मुलांना दुचाकी, कारने शाळेत साेडले. दुसरीकडे बाहेरगावहून आलेल्या प्रवाशांची काही खासगी वाहनांनी प्रचंड लूट केली. रेल्वेस्थानकातून बाबा पेट्रोल पंप चाैकात साेडण्यासाठी एका प्रवाशाकडून २० एेवजी चक्क १०० रुपये उकळले. प्रवाशांचे हाल हाेत असल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्यानंतर दुपारी संप मागे घेण्यात आला.
चिकलठाणा, सिडको परिसर, जळगाव टी पॉइंट, हडको, औरंगपुरा, सिटी चौक, सिडकाे आणि मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाबा पेट्रोल पंप आदी भागांमध्ये प्रवासी दिवसभर ताटकळलेले होते. रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या भागात उभे राहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना विराेध करत हाेते. मध्यवर्ती बसस्थानकासमोर काही लाेकांनी प्रवाशांना रिक्षातून बळजबरीने उतरवून दगडफेकही केली. काही संघटनांनी हातात झेंडे घेऊन माेर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
आज लाल बावटाची निदर्शने
शहरात ३५ हजार रिक्षा असताना मीटर कॅलिब्रेशनसाठी सहा केंद्रे आहेत. आरटीआेच्या दंड आकारणीविरोधात २ डिसेंबर रोजी लाल बावटा युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती अॅड. अभय टाकसाळ यांनी दिली.
मीटर कॅलिब्रेशनला ४५ दिवसांची मुदतवाढ
आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मध्यस्थीने आरटीओ संजय मैत्रेवार व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी ३.३० वाजता बैठक झाली. संघटनेच्या मागणीनुसार मीटर कॅलिब्रेशनसाठी ३० ऐवजी पुढील ४५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देत असल्याचे मैत्रेवार यांनी सांगितले. विनाबॅज, गणवेशाशिवाय रिक्षा चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी रिक्षाचालकांनीच केली.
रांजणगावसाठी १५० रुपये घेतले
बाहेरगावाहून येणाऱ्या बहुतांश प्रवाशांना रिक्षा बंदची माहिती नव्हती. त्याचा खासगी कार, टॅक्सीचालकांनी गैरफायदा घेत रेल्वेस्थानक ते बाबा पेट्राेल पंपाचे २० रुपयांऐवजी १०० रुपये भाडे आकारून लूट केली. रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट, सिडको बसस्थानक, पंढरपूर, रांजणगावला जाण्यासाठी १५० रुपये भाडे आकारल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.