आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांना निराेप:सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूक, संस्थान गणपतीपासून हाेणार प्रारंभ, डीजे वाजवण्यास परवानगी नाहीच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील नोंदणीकृत ७८७ मंडळांसह सुमारे ९०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांचे आज विसर्जन

नऊ दिवस जल्लोषात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (९ सप्टेंबर) विसर्जन मिरवणुकीने सांगता होत आहे. सकाळी ११ वाजता ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची महाआरती होईल, त्यानंतर मिरवणुकांना प्रारंभ होईल. विविध मंडळे व त्यांची ढोल पथकेही मिरवणुकीच्या दिशेने निघतील. प्रत्येक मंडळाला सादरीकरण करण्यासाठी वेळ मिळण्यासाठी ११ वाजता सिटी चौक चौकातून मिरवणुका मार्गस्थ होतील. राजकीय गटबाजी टाळण्यासाठी पोलिसांनी पाच दिवसांपासून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह, राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसह बैठका घेऊन वेळा काटेकोर पाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर सिडको हडको महामंडळ व नवीन औरंगाबाद गणेश महामंडळाअंतर्गत येणारे मंडळेदेखील दुपारी १२ वाजेपर्यंत मिरवणुकीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. डीजेला परवानगी नाहीच.

७८७ मंडळांची नोंदणी
पाेलिस प्रशासनाकडे ८९० गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले. यात १०३ नामंजूर करण्यात आले होते. काही मंडळांनी चुका दुरुस्त करून पुन्हा अर्ज केला होता. अखेर पोलिसांनी ७८७ मंडळांना अंतिम मंजुरी दिली. त्यासह इतर नोंदणी न झालेली काही छोटी मंडळेही मिरवणुकीत सहभागी होतील. हा आकडा नऊशेपर्यंत जाईल.

झेंडूच्या फुलांचे भाव २० रुपये, तर शेवंती ५० रुपयांनी विक्री
गणेश विसर्जनासाठी गुलालाला पर्याय म्हणून फुलांचा वापर केला जातोय. यंदा फुलांच्या बियाण्यांच्या कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींमुळे शेतकऱ्यांनी फुलशेती मोठ्या प्रमाणात केली. याचा परिणाम झेंडूच्या फुलांची आवक वाढली. जटवाडा, फुलंब्री, पोखरी, गोपाळपूर, खोडेगाव, कन्नड, करंजखेडा, हतनूर, कालीमठ, वानेगाव, जालना, बीड, गेवराई आणि अहमदनगर येथून फुलांची आवक होते. सध्या झेंडूची फुले १० ते २० रुपये तर शेवंती फुलांचे भाव ४० ते ५० रुपये किलो आहेत. १०० क्विंटल फुलांची आवक झाल्याचे फुलविक्रेते कृष्णा बोलकर यांनी सांगितले. शुक्रवारी गणरायाचे विसर्जन असून मिळेल त्या भावात फुलांची विक्री होईल, असे विक्रेते ज्ञानेश्वर लगड, मनोज काळे यांनी सांगितले.

बॅरिकेड‌्स लावणार : मिरवणुकीच्या मार्गावरच नागरिक वाहने उभी करू नये यासाठी पोलिस विभाग व मनपाने संयुक्तिक नियोजन केले. एक मंडळात जवळपास एक ते तीन वाहने असल्याचा अंदाज आहे. यात विसर्जन मार्गांना जोडणारे सर्व मार्ग बॅरिकेडिंग लावून बंद करतील. त्यामुळे मार्गांमध्ये वाहतुकीचा अडथळा ठरणार नाही.

गाडीभाडे आठ ते दहा हजारांपर्यंत
विसर्जन मिरवणुकीसाठी लोडिंग रिक्षाचे भाडे ८०० ते हजार रुपये, छोटा हत्तीने थेट विसर्जन विहिरीपर्यंत जाण्यासाठी २०० ते ३०० रुपये, ट्रॅक्टरचे भाडे २५०० ते ३ हजार रुपये, ट्रकचे भाडे ८ ते १० हजार रुपये आहे. इंधन दरवाढीमुळे भाववाढ झाल्याचे चालक सुधाकर पंडित यांनी सांगितले.

५५०० कर्मचारी रस्त्यावर
पोलिस आणि मनपाचे मिळून सुमारे ५ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी दिवसभर रस्त्यावर तैनात असतील. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह ५०० अधिकारी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करतील. मनपातर्फे ५० ठिकाणी मूर्ती संकलन, ३८ ठिकाणी निर्माल्य संकलन केले जाणार आहे. याशिवाय विसर्जन विहीर आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. प्रत्येक विसर्जन विहिरीच्या ठिकाणी मनपाच्या आरोग्य विभागातील एक डॉक्टर आणि चार कर्मचारी, एक रुग्णवाहिका असेल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी दिली. सकाळी आठ ते रात्री १२ पर्यंत मनपाचे कर्मचारी विसर्जनस्थळी हजर राहतील.

१९ रस्ते वाहतुकीस बंद
२५४२ पाेलिसांचा बंदाेबस्त
प्रत्येक पोलिस ठाण्याला एक अधिकारी व दोन अंमलदार ध्वनी प्रदूषण मोजतील.

बातम्या आणखी आहेत...