आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने “हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत 13 ते 15 आगस्टदरम्यान घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केलेे आहे. त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी झेंडे तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेने अंकित काॅटेजला दिले आहे. त्यानुसार 1 आगस्टपासून सिडको एन-1 येथे 150 महिला दररोज 50 हजार झेंडे तयार करत आहेत. त्यांना 10 आगस्टपर्यंत 7 लाख तिरंगे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
झेंड्यासाठी सुरतमधील कापड
संपूर्ण भारताला झेंड्यासाठी लागणारे कापड सुरतमधूनच वितरित होत आहे. 20 इंच रुंदी आणि 30 इंच लांबीचा झेंडा नागरिकांना 29 रुपयांत मिळेल. तो ग्रामपंचायत, नगरपालिका, मनपामार्फत लोकांना 29 रुपयांत वितरित केला जाईल. अंकित काॅटेजचे प्रमुख मनोहर अग्रवाल यांनी सांगितले की, सुरत येथून झेंड्यासाठी तीन लाख 25 हजार मीटर कापड ट्रकमध्ये लादून आणले.
दररोज 500 ते 700 रुपये मानधन
या कामात कुणाल ठोले, रवींद्र बडे यांचाही सहभाग आहे. एका शिफ्टमध्ये साठ ते सत्तर महिला व पुरुष असे तीन शिफ्टमध्ये झेंडे तयार होत आहेत. एकाच वेळी 200 जणांचे हात निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. कामकऱ्यांना दररोज 500 ते 700 रुपये मिळत आहेत.
राष्ट्रध्वज हाताळण्यास मिळाल्याचा अभिमान
विशिष्ट आकारात कापड कापून त्याला शिवण्याचे काम महिला करत आहेत. त्यातील सुनीता औताडे म्हणाल्या की, राष्ट्रध्वज हाताळण्यास मिळाला, याचा अभिमान वाटतो. रुख्मण दाबके यांनी सांगितले की, मी शाळा, कार्यालयांत झेंडा पाहत आले. प्रत्यक्ष आपल्या हाताने हा झेंडा तयार होत आहे, ही भावना उत्साह, आनंद देणारी आहे. सारिका पाटील यांनीही हे काम अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
सुरतच्या 500 मिल तिरंग्याचे हब
सध्या सुरत शहर तिरंग्यासाठी लागणाऱ्या सिल्क पाॅलिस्टर कापडाचे हब झाले आहे. तेथील 500 पेक्षा अधिक मिल हा कपडा तयार करत आहेत. आमच्या कडूनही आतापर्यंत चार लाख झेंडे तयार झाले आहेत. दहा तारखेपर्यंत आम्ही सात लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करून ग्रामपंचायत, नगरपालिकांकडे देऊ.- कुणाल ठोले, अंकित कॉटेज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.