आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:प्लास्टिकबंदी असणाऱ्या 5 राज्यांत सर्वाधिक सिंगल युज प्लास्टिकची निर्मिती

औरंगाबाद | डाॅ. शेखर मगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदाच वापरल्या जाणाऱ्या सिंगल युज प्लास्टिकवर महाराष्ट्रात बंदी असूनही दरवर्षी ४.६९ लाख टन प्लास्टिकची निर्मिती केली जाते. २०२१ दरम्यान ३ लाख ११,२५४ टन प्लास्टिकची निर्मिती झाली. त्यापैकी अत्यंत नगण्य म्हणजेच १,४२५ टन प्लास्टिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त करून ३.९१ कोटी दंड वसूल केला आहे. महाराष्ट्रच नव्हे गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडूतही बंदी आहे. पण येथेही प्लास्टिकची निर्मिती केली जाते. देशातील १० राज्यांत पूर्णत:, तर ४ राज्यांमध्ये अंशत: प्लास्टिक वेस्टच्या निर्मितीवर बंदी आहे. सिंगल युज प्लास्टिकबंदीच्या ५ राज्यांत प्लास्टिक निर्मिती होते. कर्नाटकात वर्षाला १ लाख २९,६०० टन, उत्तर प्रदेश १ लाख ३०,७७७ टन, तामिळनाडू १ लाख ५०३२३ टन व गुजरातेत २ लाख ६९,२९४ टन सिंगल युज प्लॅस्टिकची निर्मिती होते.

३० वर्षांत व्हर्जिन प्लास्टिकचा २० पटी वापर वाढला
भारतात ३० वर्षांत प्लास्टिक वापर २० पटीने वाढला आहे. १९९० दरम्यान ९ लाख टन प्लास्टिकचा वापर होत होता. तो आता वाढून १ कोटी ८४ लाख ५० हजार टनांवर गेला आहे. प्लास्टिक एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, २०१८-२०१९ मध्ये ५१३ मेट्रिक टन प्लास्टिक आयात तर ३३१ मेट्रिक टन निर्यात केले. त्यानंतरच्या वर्षांत ५५% आयात वाढली.

भारतात दरडोई १३.६ किलोग्रॅम प्लास्टिकचा वापर
अमेरिकेत सर्वाधिक प्लास्टिकचा वापर होतो. येथे दरडोई १०८ किलो प्लास्टिकचा उपयोग केला जातो. चीनमध्ये ५६ किलो, ब्राझील ३१, तर उर्वरित देशांत सरासरी ३० किलो प्रतिव्यक्ती प्लास्टिक वापर आहे. भारतात दरडोई १३.६ किलोग्रॅम प्लास्टिक वापरले जाते.

कायदा : प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अॅक्ट २०१८ नुसार प्लास्टिक कॅरीबॅग, थर्माकोल वापरावर बंदी आहे. याचे उत्पादन, विक्री वा हाताळताना आढळले तर पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजारांचा दंड आहे. तिसऱ्या वेळी त्याच व्यक्तीने हा गुन्हा केला तर २५ हजारांचा दंड आहे. त्यानंतर ३ महिन्यांची शिक्षेच्या गुन्ह्याची नोंद होऊ शकते.

औरंगाबादेत १३ जणांवर गुन्हे
ऑक्टोबर-२०१८ ते ३१ मे २०२२ पर्यंत औरंगाबाद मनपाने ५,३८० जणांकडील ४१,२११ किलो प्लास्टिक जप्त करून १ कोटी २० लाख ४,५०० रुपयांचा दंडही वसूल केला. १३ जणांवर ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.'
-सोमनाथ जाधव, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी

कंपन्यांवरच कारवाई केली जावी
५० मायक्रॉनवरील प्लास्टिक रिसायकल करता येते म्हणून त्यावर बंदी नाही. त्यापेक्षा कमी मायक्रॉनच्या वस्तू नष्ट करता येत नाही म्हणून बंदी आहे. पण आपण किरकोळ लोकांवर कारवाई केल्याचे दाखवतो. घातक प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई व्हावी.'
- प्रोफेसर डॉ. सतीश पाटील, पर्यावरण तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...