आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पडताळणी:‘प्रोजेक्ट पिंक ऑटो’ला ब्रेक; महिला लाभार्थी, चालक पुरुष

औरंगाबाद / फेरोज सय्यद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदा रिक्षाचालकांच्या गैरवर्तनामुळे महिला व महाविद्यालयीन तरुणींना असुरक्षित सार्वजनिक वाहतुकीच्या अनुभवांना सामोरे जावे लागत असताना शहरातील “प्रोजेक्ट पिंक ऑटो’ला मात्र अनास्था व नकारात्मक दृष्टिकोनामुळे ब्रेक लागला आहे. २०१६ मध्ये औरंगाबादेत ३७ महिलांना २५% अनुदानाचे पिंक ऑटो परवाने दिलेे होते. प्रत्यक्षात त्यापैकी एकही लाभार्थी महिला स्वत: रिक्षा चालवत नसल्याचे “दिव्य मराठी’च्या पडताळणीत पुढे आले. विशेष म्हणजे अशा रिक्षा महिलेनेच चालवणे बंधनकारक नसल्याचे प्रशासनाचेच म्हणणे असल्याने महिलांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उपलब्ध चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.

महिला प्रवाशांची सुरक्षितता व गरजू महिलांचा रोजगार या दुहेरी हेतूने केंद्र सरकारच्या वतीने “प्रोजेक्ट पिंक ऑटो’ची घोषणा करण्यात आली. यामध्ये महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, परवाना व रिक्षा खरेदीसाठी २५ टक्के अनुदान ही तरतूद करण्यात आली होती. काही बँकांनी पिंक ऑटोसाठी सवलतीच्या दरात कर्जही उपलब्ध करून दिले होते. काही शहरांमध्ये नगरपालिकांच्या वतीने तर काही शहरांमध्ये महानगरपालिकांतर्फे तर काही ठिकाणी सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. औरंगाबाद शहरात मात्र या योजनेच्या ३७ लाभार्थींपैकी एकही महिला प्रत्यक्ष रिक्षा चालवत नाही. त्यांच्यातील काहींच्या रिक्षा पती वा कुटुंबातील पुरुष सदस्य चालवत आहेत, तर काहींनी रिक्षा भाड्याने दुसऱ्या चालकास चालवण्यास दिल्या आहेत.

लोकांच्या दृष्टिकोनामुळे सोडून दिले महिलेने रिक्षा चालवणे काही गैर नाही. मी काही दिवस रिक्षा चालवली. व्यवसायही चांगला होत होता. परंतु महिला रिक्षाचालकांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन खूप नकारात्मक होता. दुसऱ्या बेशिस्त चालकांमुळे रिक्षा चालवणे धोकादायकही वाटत होते. त्यामुळे शेवटी मी रिक्षा चालवणे थांबवले आणि पतींना चालवण्यास दिली. - शकुंतला जंजाळ, पिंक ऑटो लाभार्थी

महिला दुसऱ्याला चालवण्यासाठी रिक्षा देऊ शकतात रिक्षा टॅक्सीचे परवाने महिलेच्या नावे असले तरी ती रिक्षा महिलेने चालवणे बंधनकारक नाही. ती महिला दुसऱ्याला रिक्षा चालवण्याठी देऊ शकते. त्यात गैर काही नाही. परंतु त्या चालकाकडे लायसन्स व बॅज असणे आवश्यक आहे. - संजय मैत्रेवार, तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...