आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्न जीवनमरणाचा:निर्बंध लावा, पण आयुष्यातून उठवू नका, औरंगाबादमध्ये लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर इतर जिल्ह्यांतून विरोध वाढला

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली : व्यापाऱ्यांची नाराजी, प्रशासनाची हतबलता

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर आतापर्यंत मागे असलेल्या हिंगोलीतही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून घोषित केलेला कडक लॉकडाऊन जनतेच्या तीव्र विरोधामुळे मागे घेण्यात आला. मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यातही लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी छोटे व्यापारी व हातावर पोट असणारे नागरिक करत आहेत. परंतु आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे प्रशासन मात्र लॉकडाऊनवर ठाम असल्याचे दिसते. कडक निर्बंध लावा पण यापुढे लॉकडाऊन लावून आयुष्यातून उठवू नका, अशी भूमिका घेतली जात आहे.

नांदेड : मृतांची संख्या वाढल्याने लोक, प्रशासन सावध

जिल्ह्यात २५ रोजीपासून लाॅकडाऊनला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. पण रस्त्यांवर वाहनांची व लोकांची गर्दी कायम आहे. नागरिकांमध्ये काहीही गांभीर्य दिसून येत नाही. तत्पूर्वी काही संघटनांकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात येत होता. कष्टकरी वर्गाच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव नाही. लहान-मोठे दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. दुकानाचा किराया, नोकरांचा पगार द्यायचा कसा?, ही समस्या सर्वच तालुक्यांत आहे. परंतु, मृतांची संख्या वाढल्याने व्यापारी वर्गातून लाॅकडाऊन रद्द किंवा मागे घेण्याबाबत अद्याप कोणतीही मागणी करण्यात आली नाही.

हिंगोली : व्यापाऱ्यांची नाराजी, प्रशासनाची हतबलता
हिंगोलीत लॉकडाऊन लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरेाना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी दर्शविली. व्यापाऱ्यांचा विचार करून संचारबंदी शिथिल करावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांनी केली. तर, व्यापारी महासंघानेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पुढील काळात रुग्णसंख्या लक्षात घेऊन दिलासा देऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

परभणी : भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालकांवर संकट
जिल्ह्यात एक एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. पण त्यानंतर लॉकडाऊन पुढे कायम ठेवल्यास अडचणीत वाढ होणार असल्याची भीती छोटे व्यापारी, राजकीय पदाधिकारी व हातावर पोट असणाऱ्यांना वाटत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेलवर काम करणारे, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, रिक्षाचालक अशा सर्वांवर मोठे संकट कोसळले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के म्हणाले. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव सचिन अंबिलवादे यांनी दिली. भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला.

हिंगोली : संचारबंदीचेे निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, प्रकाशचंद सोनी, पंकज अग्रवाल, आनंद निलावार आदी.

बातम्या आणखी आहेत...