आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देऊ : खा. इम्तियाज

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरे पडणार या भीतीने लेबर कॉलनीवासीयांनी खासदारांच्या घरी जाऊन मांडल्या व्यथा, आश्वासनानंतर परतले मागे

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४२ हजार घरे मंजूर झाली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लेबर कॉलनी येथील दोन एकर जागा आणि एक पत्र दिल्यास महिन्यात टेंडर काढून रहिवाशांना घरे देऊ, असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी रहिवाशांना दिले. घरे पडणार या भीतीने ७ मे रोजी रहिवाशांनी खासदारांच्या निवासस्थानासमोर जाऊन व्यथा मांडल्या. खासदारांनी आश्वासन दिल्यानंतर रहिवाशांनी आपल्या घराचा रस्ता धरला. या वेळी गटनेते नासेर सिद्दिकींसह सिटी चौक पोलिस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

न्यायालयाच्या निकालानंतर लेबर कॉलनीतील घरे पाडणार असल्याने रहिवाशांनी खासदारांच्या निवासस्थानी पोहचले. तेव्हा खा. इम्तियाज घरी नव्हते. मात्र, लेबर कॉलनीतील रहिवासी घरी आल्याची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांचा फौजफाटा त्यांच्या निवासस्थानासमोर आला. आम्हाला प्रशासन बेघर करत आहे, आमची घरे वाचवा, अशी याचना लेबर काॅलनीतील महिला करत होत्या. खा. इम्तियाज घरी पोहोचले. त्यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लेबर कॉलनीच्या एकूण जागेपैकी दोन एकर जागा देऊन पत्र दिल्यास प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देता येईल. त्यासाठी एका महिन्यात टेंडर काढण्यात येईल. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायकांशीही बोलणे झाले आहे. याव्यतिरिक्त प्रशासनाने चार ठिकाणी जागा पाहिली आहे. लेबर कॉलनीवासीय शिष्टमंडळाने त्याविषयी आपली संमती दर्शवल्यास त्यावरही चर्चा करून पर्यायी जागा उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे दोन्ही पर्याय म्हणून विचार करावा, असे आवाहन करत “तुमचे घरे पडू देणार नाही,’ असे आश्वासन खासदार इम्तियाज यांनी रहिवाशांना दिल्यानंतर नागरिक घरी गेले.

तुम्ही माझ्या वडिलांसारखे, मदत करा
“माझ्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. आता आमचे छत्रही गेल्यास आम्ही काय करायचे? तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, आम्हाला मदत करा,’ अशी याचना स्वराली वर्मा या मुलीने केली. भीमाबाई थोरात ही वृद्ध महिला म्हणाली की, तुम्ही आमचे पालक आहात, आता तुम्हीच आमची मदत करा. त्यावर खासदार इम्तियाज म्हणाले, मी तुमचा मुलगा आहे. तुमचे आशीर्वाद असू द्या. मार्ग निघेल.

बातम्या आणखी आहेत...