आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ताई शाळा सुरु होईल तेंव्हा होईल पण आम्हाला सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन द्या; 62 गावातून सॅनिटरी पॅडची मागणी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • अस्मिता योजना "बाजूला' ? ग्रामीण भागातील मुलींच्या 'त्या' दिवसातील अडचणी कायम

'ताई आम्हाला माहिती नाही शाळा केंव्हा सुरु होईल. पण शाळा जेंव्हा सुरु होईल तेंव्हा होवू देत. आमच्या गावातील महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन द्या', अशी मागणी ग्रामीण भागातून आरोग्य मित्रांकडे होते आहे. जवळपास ६२ गावातून सॅनिटरी पॅडची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील महिला आणि मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने घेतला होता. या योजनेचा गाजावाजा मागील सरकारच्या काळात करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत मासिक पाळीच्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर "त्या काळात' योग्य ती स्वच्छता न बाळगल्यामुळे महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि विद्यार्थिनींना पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन वाटण्यात येत होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. सध्या शाळा बंद असल्यामुळे या योजनेचा लाभ मुलींना मिळत नसल्याचे समोर अाले असून, शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता योजना कागदावर सुरु आहे. पण फिडबॅक नसल्याचे खुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन कायम आहे. तर शाळा देखील बंद आहे. शाळा सुरु असतांना अस्मिता योजनेअंतर्गत माफक दरात मुलींना सॅनिटरी पॅड मिळत असे. परंतु शाळाच बंद असल्याने या योजनेचा लाभ मुलींना मिळत नाही. ग्रामीण भागात आणायचे कुठून अशी समस्या असल्याने मुलींच्या अडचणी वाढल्या आहेत. अशी माहिती डॉ.हेडगेवार रुग्णालय अंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या मेडिकल ऑफिसर डॉ.सई पाटील यांनी दिली. तर ६२ गावातून सॅनिटरी पॅडची मागणी सध्या आहे. असे डॉ.प्रतिभा फाटक यांनी सांगितले.

अस्मिता योजना सुरु आहे. पण त्याचा फिडबॅक सध्या नाही. शिवाय सरकार बदलले आहे. राज्यात लॉकडाऊन देखील आहे. सूरजप्रसाद जयस्वाल प्राथमिक शिक्षणाधिकारी

अशी आहे अस्मिता योजना

महिला आणि बालविकास अंतर्गत मागील सरकारने मुलींच्या त्या दिवसांसाठी अस्मिता योजना सुरु केली होती. माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेचा गाजतवाजत शुभारंभ केला होता.  ग्रामीण भागातील महिला आणि ११ ते १९  वयोगटातील शाळकरी मुलींना या योजनेचा फायदा होणार होता. या योजनेअंतर्गत पाच रुपयात मुलींना आठ सॅनिटरी नॅपकीनचा पॅक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत होता.  योजनेअंतर्गत एका मुलीचा वर्षभराचा खर्च साधारणपणे १८२ ते २००  रुपये आहे. तर बाहेरुन घेतांना इतर ब्रॅण्डचा विचार केल्यास चाळीस ते बेचाळीस रुपयात आठ पॅडचे पाकीट येते.

बातम्या आणखी आहेत...