आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा:जखमी विद्यार्थिनीसाठी परीक्षेत बेडची सोय ; 95.02 टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी रविवारी शहरातील १४ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत पहिल्या पेपरसाठी ९५.०२ टक्के, तर दुसऱ्या पेपरसाठी ९४.९७ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. औरंगपुरा परिसरातील परीक्षा केंद्र असलेल्या शारदा मंदिर कन्या प्रशाळेत अंधारी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी साक्षी संतोष उबाळे या विद्यार्थिनीचा अपघातात पाय दुखावला गेला होता. या विद्यार्थिनीसाठी केंद्रावर बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सूचनांचे पालन करत आणि विद्यार्थिनीची स्थिती पाहून तिच्यासाठी बेडची व्यवस्था केल्याचे उपमुख्याध्यापिका वंदना रसाळ यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील १४ केंद्रांवरील १८३ ब्लॉकमध्ये ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी जिल्ह्याची एकूण क्षमता ४ हजार ३९२ इतकी होती. मात्र, यंदा एकूण ४ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यात मराठी माध्यम ४०७३, उर्दू माध्यमाचे ८७, इंग्रजी माध्यमाचे १११, तर हिंदी माध्यमाचे दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सकाळच्या सत्रात झालेल्या मानसिक क्षमता चाचणी पेपरमध्ये ४०६० विद्यार्थी उपस्थित होते, तर २१३ अनुपस्थित होते. एकूण ९५.०२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

दुपारच्या सत्रात ४०५८ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २१५ जण अनुपस्थित होते. एकूण ९४.९७ विद्यार्थ्यांनी दुसरा पेपर दिला, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी जी. व्ही. चौरे यांनी दिली. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले. या परीक्षेसाठी बाळासाहेब चोपडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...