आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराग ही एक भावना आहे. सर्वांनाच राग येणे साहजिकच आहे. तो मनात दाबून ठेवू नका, व्यक्त व्हायलाच हवे, अन्यथा बीपी, हृदयाचा त्रास होऊ शकेल. आपले मत शांतपणे मांडावे. दुसऱ्यांच्या भावना दुखावतील असे अजिबात बोलू नये, वागू नये. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम त्याची कारणे शोधली पाहिजेत, असा सल्ला पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मुक्ता पुणतांबेकर यांनी शनिवारी दिला.
सिडको एन-६ मधील प्रेरणा हॉस्पिटल व पुनर्वसन केंद्र आणि पंख फाउंडेशन यांच्या वतीने ‘रागाची ऐशीतैशी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. माणिक भिसे, डॉ. सादिक कुरेशी, डॉ. आशिष मोहिदे यांची उपस्थिती होती. प्रेरणा रुग्णालयातच हा कार्यक्रम झाला. या वेळी सुमारे दीडशे जणांची उपस्थिती होती.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय करा बऱ्याचदा चूक दुसऱ्याची असते, पण आपण स्वत:ला त्रास करून घेतो. यातून राग वाढतो. मात्र रागावर नियंत्रण ठेवले तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकू, त्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. रागाचे मूळ कारण शोधून निराकरण करा. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करून बोला. राग मनात दाबून ठेवू नका, व्यक्त व्हा. दुसऱ्या व्यक्तीसमोर, मुलांसमोर भांडणे करू नयेत. रागाच्या भरात मुलांवर चिडू नये. भांडण झाले तरी त्याच विषयावर बोलावे, विषय बदलू नयेत. एखाद्या वादाला वेळेची मर्यादा असावी, ती लांबवू नये. एक व्यक्ती चिडलेली असताना दुसऱ्याने शांत बसले पाहिजे. पती-पत्नीचे वाद वाढत असतील तर जवळच्यांनी मध्यस्थी करावी. नकारात्मक विचार नकोच मनाविरुद्ध एखादी घटना घडते त्या वेळी राग येतो, ती एक भावना आहे. झोप पूर्णपणे न होणे, भूक लागणे, शारीरिक थकवा येणे, किशोरवयात होणारे बदल आदी कारणांमुळे व्यक्तीला राग येतो. नेहमी राग येणे, चिडचिड होणे चांगले नाही. त्यामुळे बीपी, हृदयाचे ठोके वाढणे, अन्नपचन व्यवस्थित होत नाही, झोप न लागणे, मनात नकारात्मक विचार येणे असे आजार वाढू शकतात. मुक्ता पुणतांबेकर, मानसोपचारतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.