आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लाेकांनी काेविड नियमांचे पालन करावे, मगच सरकारला दाेष द्यावा, औरंगाबाद खंडपीठाच्या बेशिस्त नागरिकांना कानपिचक्या

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जिथे राहतो त्या ठिकाणाबद्दल थोडीफार निष्ठा, संवेदनशीलता दाखवली पाहिजे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना त्याचे सरकारवर खापर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोविड नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वावरणाऱ्या नागरिकांना कानपिचक्या दिल्या आहेत. मास्कचा केवळ शाेभेपुरता वापर करून फिरणाऱ्या व्यक्ती काेराेनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात असे लोक, कोविड नियमांचे सक्तीने पालन करण्यासाठी कार्यरत पोलिसांवर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी सोमवारी (२६ एप्रिल) प्रशासनाला दिले. तसेच औरंगाबादेत विद्युत शवदाहिनीसंबंधी कृती आराखडा तयार करण्याचे आणि ग्रामीण भागात अँटिजन चाचण्या वाढवण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.

काेराेना काळात हाेणारा रेमडेसिविरचा काळाबाजार, काेराेना मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी नातलगांची हाेणारी फरपट, विद्युतदाहिनीचे रखडलेले काम आदी विषयांचे प्रश्न दैनिक दिव्य मराठीने वारंवार उपस्थित केले. त्यासह इतर माध्यमांतील याच विषयांच्या बातम्यांचा आधार घेऊन खंडपीठाने फाैजदारी सुमाेटाे याचिका दाखल करून घेतली हाेती. त्यावर साेमवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायमूर्तींनी महामारी राेखण्यासाठी प्रशासन व नागरिकांसाठी नवीन आचारसंहिता घालून दिली. तसेच राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाचे प्रधान सचिव, अन्न व औषधी प्रशासनाचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव आदींना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांनी ३ मे रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सत्यजित बोरा यांनी काम पाहिले, तर सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर काळे यांनी शासनाची बाजू मांडली.

नेतेगिरीला चाप : संचारबंदीत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नसलेल्या व्यक्तीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर दबाब आणणाऱ्या लोकप्रतिनिधी, राजकारण्यांवर गुन्हा दाखल करा.

अंत्ययात्रेत गर्दी नकाे : काेराेनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसवण्याचा पर्याय प्रशासनाने तपासून पाहावा. यासाठी कृती आराखडा तयार करा. कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी नियमानुसार दिलेल्या परवानगीचे काटेकारेपणे पालन व्हावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा. अंत्यसंस्कारांच्या वेळी गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताे. ते रोखण्यासाठी प्रसंगी गुन्हे दाखल करावे लागले तरी ते करावेत.

रुग्ण, बिलांचा अहवाल द्या : औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त किंवा अधीक्षक यांनी रुग्णसंख्या, उपलब्ध खाटांची संख्या, रेमडेसिविर व ऑक्सिजनची उपलब्धता, काेविड रुग्णांच्या उपचारांचे बिल यासंबंधीचा अहवाल सादर करावा.

ग्रामीण भागात चाचण्या वाढवा : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठ्या गावांमध्ये अँटिजन चाचणीची सोय करावी. पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे, आपल्या जिल्ह्यात पुरेसा साठा असावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.

अनेक तरुण-तरुणी विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसतात. मास्क, हेल्मेट नसलेले लोक ट्रिपल सीट, काही वेळा चार-चार लोक बाइकवर फिरतात. घराबाहेर पडताना प्रत्येकाने नाक व तोंड पूर्ण झाकले जाणारे मास्क घातलेच पाहिजेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर लोकांचा बचाव करणाऱ्या लोकप्रतिनिधी, राजकारण्यांविरोधात गुन्हे दाखल करा.- न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार

विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करा
विनामास्क लोक सुपरस्प्रेडर ठरत आहेत. मास्क केवळ गळ्यात अडकवलेली किंवा हनुवटीवर ठेवलेला असलेली व्यक्ती दिसली तर त्याच्याविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल करावा. निकषांप्रमाणे मास्कचा वापर न करणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करावी.

नगरचे भाजप खासदार सुजय विखेंविरुद्ध याचिका : नगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी दिल्लीहून थेट कंपनीतून दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणले व ते जिल्ह्यात वाटले हाेते. त्यांच्या या कृतीविराेधात अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठात फाैजदारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी खा. विखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती अॅड. तळेकर यांनी याचिकेत केली आहे. पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...