आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत लॅब चालवणाऱ्याला 6 महिन्यांची सक्तमजुरी:प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथे अनधिकृत लॅब चालवल्याप्रकरणी कौसर हॉस्पिटलच्या डॉ. सालेह कौसर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोहम्मद इम्रान गांधी यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2016 रोजी ठोठावलेली सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी कायम केली.

प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्य वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 चे कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात साक्षी-पुराव्यांवरुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.

सुनावणीवेळी, आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, डॉ. सालेह कौसर या एमबीबीएस असून, त्यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे त्या दोषी नाहीत, असे आरोपीतर्फे नमूद करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आशिष दळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा दाखल दिला.

तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व इंडियन मेडिकल कौन्सिल यांनी ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसारच वैद्यकीय व्यावसायिकाची नोंदणी होते. व वैद्यकीय व्यावसायिक ज्या शाखेचा निष्णात आहे, त्याच शाखेत व्यवसाय करू शकतो, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर, डॉ. कौसर यांची शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस असल्यामुळे त्या त्याच क्षेत्रात व्यवसाय करू शकतात.

त्याचवेळी पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार केवळ ‘एमबीबीएस, एमडी इन पॅथॉलॉजी’ अशी शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीलाच आहे, असे जिल्हा व सत्र न्यायाधीश पिंगळे यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डीएमएलटी अशी शैक्षणिक पात्रता धारण करणारा आरोपी मोहम्मद इम्रान यांनी पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करणे चुकीचे व बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...