आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीत नव्या मुगाची हमीभावापेक्षा कमी खरेदी:आडत व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीला केराची टोपली

संतोष देशमुख । औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी 8 क्विंटल नव्या मुगाची आवक झाली होती. या मुगाला किमान 6100 तर कमाल 6711 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. केंद्र सरकारने 7 हजार 755 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र, ओले, आर्द्रतायुक्त मूग असल्याचे कारण देत आडत व्यापारी हमीभावापेक्षा 1044 ते 1655 रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

यंदा जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मान्सून दाखल झाला होता. जुलैमध्ये धो-धो विक्रमी पाऊस पडला. तसेच केंद्र सरकारने मुगाला 7 हजार 755 रुपये हमी भाव जाहीर केला. त्यामुळे मुगाची पेरणी 90 टक्के क्षेत्रावर झाली होती. पिकही चांगले आले. ऑगस्टमध्ये 48 टक्केच पाऊस पडला. उघडीप मुग, उडीद, पिकासाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे काढणीस आलेल्या मुगाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या चांगले हाती आले असून सोंगणी व काढणी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका

पोळा धुमधडाक्यात साजरा केला. आता श्री गणेश उत्सव, महालक्ष्मीचे आगमन होत आहे. याच बरोबर कौटुंबिक खर्च, मुला मुलींचे शिक्षण, आरोग्य, पेरणीसाठी घेतलेले हात उसने परत करण्यासाठी शेतकऱ्यांनी​​​​​​ नवीन मूग विक्रीला आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाजारात किमान आधारभूत किंमतीपेक्षा एक ते सोळाशे रुपयांवर कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण

केंद्र शासनाने 2022-23 या हंगामासाठी विविध कृषी उत्पादनांच्या सुधारीत किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मुगाला प्रति क्विंटल​​​​​​​ 7 हजार 755 रुपये हमी भाव दिलेला आहे. त्यापेक्षा कमी दराने खरेदी विक्री होऊ नये. होत असल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी पणन विभागाने यावर लक्ष ठेवून शेत मालाला किमान आधारभूत किंमत मिळवून द्यावी, अशी जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच शासकीय खरेदी विक्री केंद्र वेळेत सुरू करून येथे हमी भावाने शेतमाल खरेदी विक्रीची सोय उपलब्ध करून द्यावी, असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात कृती होत नाही.

आदेशाची पायामल्ली

केंद्राच्या आदेशाला सर्रास केराची टोपली दाखवली जात आहे. सोमवारी 8 क्विंटल नवीन मुगाची आवक झाली होती. किमान 6100, कमाल 6711 आणि सर्वसाधारण 6405 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सरकारचे धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचे मूग उत्पादक नारायण सुरे यांनी सांगितले. त्यांच्या पाच गोण्या मुगाला सहा ते 6500 हजार रुपये भाव मिळाला. तर त्यांचे भाऊ लक्ष्मण सुरे यांच्या दोन गोण्या मुगाला सर्वाधिक 6711 रुपये भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...