आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कंबरदुखीची तक्रार घेऊन आलेल्या एका महिलेचे निदान करताना तिच्या संपूर्ण शरीरात पस (पू) झाल्याचे डॉक्टरांना आढळले. अत्यंत किचकट अशा तीन शस्त्रक्रियांनंतर पस बाहेर काढण्यात आला आणि महिला ठणठणीत बरी झाली आहे. तिला पूर्वीच्या आजाराचा इतिहास नाही. मात्र, अँटिबॉडी टेस्टमध्ये त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून हे कोरोनानंतरचे नवीन लक्षण असल्याच्या निष्कर्षावर डॉक्टर आले आहेत. जगात अशा प्रकारच्या एकूण सात केसेस घडल्या असून भारतातील ही पहिलीच केस आहे.
बजाजनगरमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षांच्या महिला अंजली (नाव बदलले आहे) २८ नोव्हेंबर रोजी डाॅ. हेडगेवार रुग्णालयात कंबरदुखीच्या उपचारासाठी आल्या. त्यांच्या पायावर सूज होती. दिवाळीत भरपूर काम केल्यामुळे हा त्रास होत असावा, असा अंदाज होता. फ्रॅक्चर, ट्यूमर किंवा इन्फेक्शनमुळे तीव्र कंबरदुखी जाणवते. त्यांना फ्रॅक्चर, ट्यूमर नव्हता. इन्फेक्शन असेल तर भूक आणि झोप न लागणे, खूप ताप येणे, थकवा लागणे किंवा वजन कमी होणे ही लक्षणे असतात. त्यांना यापैकी एकही लक्षण नव्हते.
रक्त संक्रमणही झाले
त्यांच्या शरीरात मानेपासून माकडहाडापर्यंत, मज्जारजूमध्ये पाठीपासून माकडहाडापर्यंत, दोन्ही हात, पोटात, किडनीशेजारी, दोन्ही पार्श्वभागांत पू जमा झाला होता. या पसचे रक्तसंक्रमणही (सेप्टिसेमिया) झाले होते. यामुळे हात-पाय अधू होण्याचा, तर रक्त संक्रमणामुळे जीव जाण्याचा धोका होता. शस्त्रक्रिया करून पू काढण्याचा निर्णय घेतल्याचे हेडगेवार रुग्णालयाचे मणकाविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत दहिभाते म्हणाले.
अर्धा लिटर पस :
पहिल्या दिवशी डॉ. दहिभाते यांनी मणक्यातून तर शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद वैद्य यांनी पार्श्वभागातून पस काढला. पुढील २ दिवस महिला व्हेंटिलेटरवर होती. मग मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. रजनीकांत जोशी यांनी पोटातील पस काढला. एकूण ५०० एमएल पस काढल्यावर ५ दिवस आयसीयूत ठेवून महिलेला बाहेर आणण्यात आले. १० व्या दिवशी त्या आधार घेऊन चालू लागल्या. २१ व्या दिवशी २१ डिसेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळाला. फिजिशियन डॉ. श्रीकांत देशमुख आणि भूलतज्ज्ञ डॉ. अंजली कुलकर्णी यांचे शस्त्रक्रियेत सहकार्य मिळाले. सुमारे ५०० एमएल पस निघाल्याचे डॉ. दहिभाते म्हणाले.
भारतातील पहिली केस
महिलेला कोरोना होऊन गेला होता. यातच त्यांनी रोगप्रतिकारशक्ती गमावली आणि स्टेफल्लो काेकस ऑरियस बॅक्टेरियांचे संक्रमण झाले. डॉ. दहिभाते यांनी याबाबत जागतिक केस स्टडीज तपासल्या. त्यात जागतिक ख्यातीच्या जर्नल ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये “कोरोनानंतरची असामान्य लक्षणे’ या विषयावर सप्टेंबर महिन्यात प्रकाशित संशोधन लेख दिसला. त्यावरून आतापर्यंत जर्मनीत अशा ६ केस झाल्याचे समजले. भारतात अशा प्रकारची ही पहिलीच केस ठरली. दरम्यान, पस झाल्याचे आधी का नाही लक्षात आले? पस कशामुळे झाला? बॅक्टेरियाचे संक्रमण कसे झाले? डॉक्टरांच्या चमूला याची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत.
काळजी घेणे गरजेचे
कोरोना होऊन गेला म्हणजे आपण सुरक्षित झालो, असे समजण्याचे कारण नाही. भविष्यात त्यापासून होणारे वेगवेगळे त्रास समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. श्रीकांत दहिभाते, मणकाविकारतज्ज्ञ, डॉ. हेडगेवार रुग्णालय
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.