आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोरोनाचा घरातील ‘कर्त्यां ’वरच घाला, वेदनांच्या आगडोंबातून सावरत मायलेकांनी संसार सावरला

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: रोशनी शिंपी
  • कॉपी लिंक
  • ज्यांचा आधार ते छत्रच हरपले, दु:ख बाजूला सारून स्वत:च बनल्या छत्र

जुन्या औरंगाबादेत गेल्या पाच पिढ्यांपासून तेलाचा व्यवसाय करणाऱ्या मकरिये कुटुंबास सर्वात मोठे कुटुंब म्हणून सगळे जण ओळखतात. मे महिन्याचा शेवटचा आठवडा मकरियेंसाठी जीवघेणा ठरला. कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. आजही त्यांचे नसणे सगळ्यांना असह्य करते. मात्र, दु:ख बाजूला सारून त्यांनी आयुष्य सुरू केलंय. तीस वर्षांपूर्वी संजीवनी लग्न होऊन या कुटुंबात आल्या. दोन भावांच्या एकत्र व्यवसायामुळे मकरिये कुटुंब एकत्रच राहत होते. कोरोना सुरू झाला तेव्हा रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असलेल्या मोठ्या बंधूंना दुकानात न पाठवण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतला. लहान बंधू मुलांसोबत दुकानाचे कामकाज पाहत होते.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा आमच्या कुटुंबासाठी भयावह स्वप्नासारखा आहे. संजीवनी सांगत होत्या, ८ मेच्या शनिवारी त्यांचे पती दुकानातून परतले. जिना चढतानाच त्यांना धाप लागू लागली. ज्या रुग्णालयात दाखल केले तिथे ऑक्सिजन तर होता, पण व्हेंटिलेटर नव्हते. व्हेंटिलेटर होते तेथे बेड उपलब्ध नव्हता. ही धावपळ सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी जाऊबाई विमल रामदास मकरिये यांनाही त्रास जाणवू लागला. मग, त्यांना रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसांनी दीर रामदास यांनाही त्रास सुरू झाला. मग, त्यांनाही रुग्णालयात हलवले. शेवटी १९ मे रोजी रामदास यांनी शेवटचा श्वास घेतला. दोनच दिवसांत जाऊबाईंनी प्राण सोडले. भाऊ व वहिनी गेल्याचे त्यांनी पतींना सांगितले नाही.

पतीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पहाटे त्यांच्यासाठी रुग्णालयात चहा घेऊन जाण्यासाठी मुलगा निघाला. इतक्यात फोन वाजला. पलीकडून कळले की तेही गेले. आठवडाभरात भरल्या कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. दीर आणि भावजयीपाठोपाठ पतीही गेले. आता मी आणि दोन मुलंच उरलो आहोत हे सांगताना मात्र संजीवनींना अश्रू रोखता आले नाहीत. त्यांचा मोठा मुलगा आकाश १८ वर्षांचा आहे. वडिलांना मदत करण्यासाठी कधीतरी दुकानात जात होता. आकाश सांगतो, वडील सांगायचे, पुढे दुकान तुलाच चालवायचे आहेत, आता मजा करण्याचे दिवस आहेत. पण काका-काकूंसह त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागल्याने आकाशवर दुकानाच्या कारभाराची जबाबदारी येऊन पडली. रुग्णालयात होते, पण वडील दररोज कारभाराची विचारपूस करत होते.

एकट्यावर दुकान पडलं म्हणून खंतावतही असल्याचे आकाश सांगतो. आता संजीवनी आणि आकाश या मायलेकावर कुटुंबाची व दुकानाची जबाबदारी येऊन पडली. यात जावई शंतनू बसैय्ये यांची मोलाची साथ मिळाल्याचे त्या सांगतात. आकाशही दुकान सांभाळू लागला आहे. काहीजण मदत करतात, काहीजण नाही. त्यातूच शिकतो आहे. “मी व्यवसायात उतरल्यावर आणखी एजन्सी घेण्याचे वडिलांचे स्वप्न होते. पण मी ते लवकरच सत्यात उतरवेन’, आकाश सांगत होता. एकाच आठवड्यात कुटुंबातील तिघांना गमावल्याच्या धक्क्यातून मकरिये कुटुंब अद्याप सावरलेले नाहीत. पण, आता दु:ख बाजूला सारून त्यांनी नव्याने प्रवासाला सुरुवात केली आहे, हे सांगताना आकाश गहिवरला होता.

...तरी माेडला नाही कणा!
कोरोनाच्या कहरात अनेक कुटुंबांवर एकापेक्षा अधिक सदस्यांना गमावण्याची वेळ आली. सगळ्यांसाठीच मानसिक, अार्थिक, भावनिक या सर्वच पातळ्यांवर हा माेठा धक्का हाेता. त्यातून सावरण्याचा अाता हे सारे प्रयत्न करताहेत. काेराेनाने घाला घातलेल्या कुटंुबांच्या या वेदना अाणि परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी त्यांनी एकवटलेले बळ “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी जाणून घेतले.

बातम्या आणखी आहेत...