आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर राजकारण:औरंगाबाद घाटीवरुन ‘एमआयएम’मध्ये धुसफूस, खासदार जलील आणि कादरी यांचा एकमेकांवर हल्लाबोल

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतदेहाचा तरी सन्मान ठेवा; खासदार इम्तियाज यांची टीका
  • आपला लढा काेराेनाशी, डाॅक्टरांशी नव्हे; डाॅ. गफार कादरी यांचा टाेला

काेराेनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेत असताना आराेग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे स्ट्रेचरवरून खाली घसरला. घाटीत साेमवारी दुपारी झालेल्या मृतदेहाच्या या अवहेलनेची छायाचित्रे काही नागरिकांनी एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना पाठवली. त्यावरून खासदारांनी हे फाेटाे टि‌्वट करून घाटीतील कर्मचाऱ्यांच्या माणुसकीशून्य कारभाराविषयी संताप व्यक्त केला. ‘रुग्ण मृत झाल्यावर तरी त्याच्या मृतदेहाचा सन्मान ठेवा. या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने समज देण्याची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरीकडे एमआयएमचेच प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी घाटीला भेट देऊन तेथील डाॅक्टर व प्रशासन याेग्य काम करत असल्याची पावती दिली. या घटनेच्या निमित्ताने एमआयएममधील दाेन प्रमुख नेत्यांमधील गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, ‘रुग्णवाहिणेकेतून मृतदेह स्ट्रेचरवर घेताना तो एका बाजूला कलंडला. मात्र त्याच वेळी आमच्या तीन कर्मचाऱ्यांनी तो सावरला,’ सारवासारव घाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी केली. घाटीत आतापर्यंत असे प्रकार कधीच झाले नसल्याचेही सांगितले.

साेमवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे खासदार इम्तियाज जलील यांनी टि‌्वट करून घाटीचा कारभार चव्हाट्यावर आणला हाेता. याबाबत ‘दिव्य मराठी’शी बाेलताना खासदार म्हणाले, ‘घाटीच्या कामाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यात सुधारणा व्हायला हवी. सोमवारी दुपारी मला एका नागरिकाने फोटो काढून मृतदेहाची अवहेलना हाेत असल्याकडे लक्ष वेधले हाेते. घाटीने मृत माणसाचा तरी सन्मान ठेवावा. मृतदेहाची चांगल्या रीतीने काळजी घ्यायला हवी. आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह चांगल्या स्थितीत मिळावा अशी त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मृतदेह चांगल्या पद्धतीने हाताळण्याबाबत वरिष्ठांनी सूचना देणे गरजेचे आहे.’

प्रदेश कार्याध्यक्षांकडून घाटीचे काैतुक : एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. गफार कादरी यांनी साेमवारी घाटीला भेट देऊन तेथील डाॅक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे काैतुक केले. ते म्हणाले, ‘घाटीतील डॉक्टर अतिशय उत्तमरीत्या काम करत आहेत. काेराेनाग्रस्तांची चांगली सुश्रूषा करत आहेत. मात्र काही असुशिक्षित लोक गैरसमज पसरवतात, तर काही लाेक घाटीत येऊन डाॅक्टर व कर्मचाऱ्यांसाेबत गैरवर्तन करतात. येथील कारभारावर आराेप करणाऱ्यांनी एक तास तरी पीपीई किट घालून दाखवावे, मग त्यांना कळेल डॉ़क्टर कुठल्या परिस्थितीत काम करत असतात. रुग्णालयात गाेंधळ घालणारे लाेक चुकीचे काम करत आहेत. येथील प्रशासनाने गरज लागल्यास कधीही फोन करून कळवावे. त्यांना मदत देण्यास आम्ही तयार आहाेत.’ मृतदेहाच्या फाेटाेबाबत विचारले असता डाॅ. कादरी म्हणाले, ‘आपला लढा कोरोनाविरुद्ध आहे, डॉक्टर अथवा कर्मचाऱ्याविरुद्ध नाही. एखाद्या वेळेस कर्मचाऱ्याकडून चूक होऊ शकते. मात्र याचा अर्थ सर्वच प्रशासन चूक आहे असे नाही. काेराेनाग्रस्ताच्या मृतदेहाला हात लावण्यास नातेवाईकही तयार हाेत नसताना कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र घाटीत बसलेले काही ‘व्हाॅट‌्सअॅप युनिर्व्हसिटी’चे लोक फोटो व्हायरल करतात. मात्र इम्तियाज जलील यांनी त्याची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे.’

मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाटीत राजकारण

आैरंगाबाद मनपाच्या निवडणुका ताेंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर घाटीत राजकारण पेटले आहेे. आपणच समाजासाठी कसे काम करत आहाेत हे दाखवण्याचा काही पक्ष प्रयत्न करत असतात. त्यामुळे काही दिवसांपासून एमआयएम व इतर पक्षाचे काही कार्यकर्ते वारंवार घाटीत येऊन तेथील अव्यवस्थेविषयी डाॅक्टरांना जाब विचारत असतात. काही दिवसांपूर्वी तर एमआयएमच्या एका गटाने मध्यरात्री तिथे गाेंधळही घातला हाेता. त्यानंतर घाटीतील डाॅक्टरांनी खासदार इम्तियाज यांची भेट घेऊन त्रास देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरा, असे साकडेही घातले हाेते.

घाटीतील समस्या विधिमंडळात मांडणार : बागडे

शहरात एकीकडे काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घाटी प्रशासनाच्या रुग्ण हाताळण्याच्या पद्धतीमुळे तेथील इतर रुग्णांना कोविडचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, असा आराेप विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनीही केला आहे. घाटीच्या अशा चुकीच्या कार्यपद्धतीमुळे काेराेनाचे संकट अधिक गंभीर बनत आहे. सामान्य रुग्ण व काेविडच्या रुग्णांसाठी एकच स्ट्रेचर, एकच बेड वापरले जात असल्याच्या तक्रारी आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...