आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह:केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या 50 ‘संरक्षित’ वास्तूच हरवल्या! काही पाण्याखाली, काही जंगलात गुडूप

महेश जोशी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काहींवर अतिक्रमणे, संसदेच्या स्थायी समितीची निरीक्षणे

लहानसहान वस्तू हरवल्याचे प्रसंग नेहमीच घडतात. मात्र, एखादी भलीमोठी "वास्तू', तीसुद्धा सरकारने सांभाळून ठेवलेली हरवल्याचे कधी एेकले आहे का? मात्र, ही बाब अगदी खरी असून सरकारनेच ते मान्य केले आहे. केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या (एएसआय) ताब्यातील "राष्ट्रीय संरक्षित' अशा ५० वास्तू हरवल्याचे केंद्राच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारने त्यांचा शोध घेतला. पैकी काही पाण्याखाली गेल्या, काही घनदाट जंगलात गुडूप झाल्या तर काहींचे पत्तेच सापडत नसल्याने पुरातत्त्व खातेही चक्रावले आहे. यात महाराष्ट्रातील २ वास्तूंचा समावेश आहे.

राष्ट्रीय संरक्षित वास्तू हरवल्याची बाब केंद्राने "भारतातील बेपत्ता एेतिहासिक वास्तूसंबंधीचे प्रश्न आणि संरक्षण' या अहवालात मान्य केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर २०२२ रोजी केंद्राच्या परिवहन, पर्यटन आणि सांस्कृतिक विषयासंबंधीच्या स्थायी समितीने हा अहवाल राज्यसभा आणि लोकसभेत मांडला. समितीत राज्यसभेचे ९ तर लोकसभेचे २१ सदस्य आहेत. यात बेपत्ता वास्तंूची यादी सादर करण्यात आली आहे.

देशात ३६९३ संरक्षित स्मारके
१९३० ते १९५० च्या दशकात मोठ्या प्रमाणात स्मारकांचा शोध घेऊन राष्ट्रीय दर्जा देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर नवीन शोधत असतांना जुन्या स्मारकांचे संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. भारतात ३६९३ राष्ट्रीय संरक्षित स्मारके तर ४५०८ राज्य संरक्षित वास्तू आहेत. पैकी महाराष्ट्रात २८६ राष्ट्रीय तर ३७६ राज्य संरक्षित वास्त्ू आहेत. राष्ट्रीय वास्तूंचे संरक्षण व संवर्धन केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या एएसआयमार्फत "प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष कायदा, १९५८' नुसार केले जाते. संरक्षित असताना या वास्तू हरवल्या आहेत.

२४ वास्तूंचा थांगपत्ताच नाही, ५० की ९२ वास्तू गायब?
पुरातन वास्तू गायब होण्याची बाब २०१३ मध्ये कॅगच्या एका अहवालात पहिल्यांदा समोर आली. ऑगस्ट २०१३ मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेल्या अहवालात ९२ संरक्षित वास्तू सापडत नसल्याचे नमूद होते.
पुरातत्त्व खात्याने शोधाशोध करत ४२ शोधून काढल्या, तर ५० वास्तूंचा शोध लागत नसल्याचे सांगितलेे. ५० पैकी १४ वास्तू शहरीकरणात हरवल्या.

१२ नदी, समुद्र किंवा धरणाच्या पाण्यात बुडाल्या. तर २४चा काहीच थांगपत्ता नाही. संसदीय समितीला शोध लागलेल्या ४२ वास्तूंबाबतही शंका आहे. या वास्तूंची अवस्था काय आहे? त्या जमीनदोस्त झाल्या, तुटल्या आहेत की त्या फक्त कागदोपत्रीच आहेत, याबाबत माहिती उपलब्ध नाही. यामुळे ५० की संपूर्ण ९२ वास्तू हरवल्या आहेत, याबाबत संसदीय समितीला शंका वाटते.

पुण्याजवळील दोन वास्तू गायब!
हरवलेल्या ५० वास्तूंपैकी सर्वाधिक ११ वास्तू उत्तर प्रदेशातील आहेत. हरियाणा, दिल्ली, राजस्थान व महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन वास्तू गायब आहेत. पुण्याजवळील प्राचीन युरोपियन थडगे आणि अगरकोटी येथील प्राचीन बुरुजांचा यात समावेश आहे.

काही ढासळल्या, काहींचे पत्ते सापडेनात
हरवलेल्या वास्तंूपैकी काही धरणात, तर नदी वा समुद्राच्या परिसरात असणाऱ्या वास्तू पाण्यात बुडाल्या. काही घनदाट अरण्यात असल्याने सापडत नाहीत. काही वास्तू ढासळल्या. काहींचे पत्ते सापडत नाहीत. काहींच्या परिसरात वस्ती वाढल्याने ठावठिकाणा लागत नाही, अशी स्थिती आहे.

हे तर अक्षम्य दुर्लक्ष
शहरीकरणात हरवलेल्या १४ व बुडालेल्या २४ वास्तू वाचवणे भारतीय पुरातत्त्व विभागाला (एएसआय) शक्य होते. मात्र, कॅग अहवाल येईपर्यंत ते याबाबत अनभिज्ञ होते. हे अक्षम्य दुर्लक्ष आहे. एएसआयने या ठिकाणांचा शोध घ्यावा, अतिक्रमणे काढावीत. ही स्मारके केवळ वास्तू नसून सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे जतन आवश्यक आहे.
- संसदीय स्थायी समिती, परिवहन, पर्यटन आणि सांस्कृतिक विषय.

बातम्या आणखी आहेत...