आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा:तब्बल 3 तास ताटकळलेल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी बंद गाडीतूनच दाखवला ‘हात’, झलकही दिसली नाही

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी सोमवारी (२१ नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये येणार असल्याचे कळल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मुकुंदवाडी बसस्थानकाजवळ काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते राहुल यांच्या स्वागतासाठी ताटकळत होते. आपला सर्वोच्च नेता किमान आपल्याजवळ थांबेल, स्वागताचा स्वीकार करेल, दोन शब्द बोलेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसे घडले नाही.

तीन तास ताटकळलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना बंद काचेच्या गाडीतूनच हात दाखवत प्रतितास सुमारे ६० किमीच्या वेगाने राहुल मुकुंदवाडीकडून हाॅटेल रामाकडे मुक्कामासाठी रवाना झाले. २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यामध्ये नेमक्या कोणत्या गाडीत राहुल होते आणि त्यांनी केव्हा आपल्याकडे पाहून हात उंचावला हे अनेकांना कळलेच नाही.

सोमवारी दुपारी १२.३० वाजता राहुल जळगाव जामोद येथून पदयात्रेतून हेलिकाॅप्टरने औरंगाबादला येतील. चिकलठाणा विमानतळावरून विशेष विमानाने सुरतला रवाना होतील. तेथून सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबादला येऊन मुक्काम करतील. मंगळवारी सकाळी जळगाव जामोदकडे रवाना होतील, असा कार्यक्रम जाहीर झाला. राहुल मुक्कामी येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी सायंकाळी ५.३० वाजता मुकुंदवाडी बसस्थानकाजवळ या, असे आवाहन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना पाहून राहुल ताफा थांबवतील, गाडीबाहेर येऊन स्वागताचा स्वीकार करतील आणि मोजक्या शब्दांत का होईना मार्गदर्शन करतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

रामा हॉटेलमध्ये स्वागत स्वीकारले: जिल्हाध्यक्ष डाॅ. काळे, शहराध्यक्ष शेख, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा यांनी रामा हॉटेलमध्ये राहुल यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

६० किमीच्या वेगाने गाड्यांचा ताफा हाॅटेलकडे, समर्थकांत नाराजी विमानतळावर नेत्यांना करावी लागली दीड तासाची प्रतीक्षा राहुल दुपारी १२.३० वाजता येणार असल्याने जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष युसूफ शेख, पवन डोंगरे, भाऊसाहेब जगताप आदी १२ वाजताच विमानतळावर पोहोचले. प्रत्यक्षात राहुल दीड वाजता आले. डाॅ. काळे, युसूफ शेख यांनाच राहुल यांच्याजवळ जाण्याची परवानगी मिळाली. काही सेकंदांत त्यांचे स्वागत स्वीकारून राहुल सुरतला रवाना झाले. सायंकाळी ते ५.३० एेवजी ७.३० वाजता आले.

झलकही दिसली नाही इकडे सायंकाळी पावणेपाच वाजेपासूनच कार्यकर्ते मुकुंदवाडी बसस्थानकावर आले होते. किमान १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर पंधरा मिनिटांनी राहुल येणार असा निरोप पदाधिकाऱ्यांकडून येत होता. पावणेआठच्या सुमारास राहुल यांचा ताफा वेगाने येऊन निघून गेला. गाड्यांचा प्रचंड वेग आणि दाटलेला अंधार यामुळे राहुल नेमके कोणत्या गाडीत आहेत हे कळलेच नाही. तीन तास ताटकळलेले कार्यकर्ते ‘वो गये, वो गये’ असे म्हणत घराकडे निघाले. या वेळी काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, मोतीलाल जगताप, प्रकाश सानप, सुरेखा पानकडे, सरोज मसलगे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...