आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पडेगावात अवैध गॅस रिफिलिंगवर छापा; हजार फुटांच्या अड्ड्यात 541 सिलिंडर ; गुन्हे शाखेला दिसला नाही अड्डा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पडेगावातील पॉवर हाऊससमोर अन्सार कॉलनीत नागरी वसाहतीमध्ये शेकडो सिलिंडर जमा करून खुलेआम गॅस सिलिंडर रिफिलिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री समोर आला. विशेष म्हणजे या अड्ड्याची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या विशेष पथकाने दहा तास कारवाई करत एक हजार चौरस फुटांच्या शेडमधून ५४१ सिलिंडर जप्त केले. पडेगाव भाग छावणी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येतो. त्यांना तसेच गुन्हे शाखेला खबर लागू न देता ही कारवाई झाली. त्यामुळे पोलिस दलात खमंग चर्चा सुरू आहे. दरम्यान, परिमंडळ एकच्या उपायुक्त उज्ज्वला वनकर रजेवर असल्याने दोन्ही विभागांचा पदभार सध्या गिऱ्हे यांच्याकडे आहे, अशी माहिती समोर आली. शेख मुजीब व त्याचे अन्य साथीदार रिफिलिंगचा धंदा चालवत असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या उपायुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पथकातील सहायक फौजदार हरीश खटावकर, अंमलदार शेख हारुन, आर. जे. गवळे, बी. जी. गिरी यांनी जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे, निरीक्षक विलास सोनवणे यांना सोबत घेऊन छापा टाकला. तेव्हा शाहरुख कुरेशी (२६, रा. अन्सार कॉलनी), किशोर गोकुळ खरात (३९, रा. उस्मानपुरा), ईश्वर सुखदेव पायतडक (२७, रा. घायतडकनगर) तेथे होते. सिलिंडरविषयीच्या कागदपत्रांची माहिती कुरेशी व इतरांना देता आली नाही. मग पथकाला वजन काटा, विद्युत मोटार, विद्युत संचही सापडले. हा अड्डा सय्यद मुजीब शेठ (रा. पडेगाव) यांचा असल्याचे कामगारांनी सांगितले.

एचपी, इंडेन कंपनीचे सिलिंडर सापडले छाप्यात एचपी, इंडेन कंपनीचे १२१ घरगुती ४२० व्यावसायिक सिलिंडर सापडले. या कारवाईपूर्वी काही तास आधी बेगमपुरा पोलिसांनी त्यांच्या हद्दीत अशीच मोहीम राबवली. त्यात एचपी, रिलायन्सचे ३५ सिलिंडर हाती लागले.

दीड तासाने पोलिस पोहोचले परिमंडळ दोनच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता परिमंडळ एकमधील छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर छापा टाकला. त्यानंतर छावणी पोलिस दीड तासाने अड्ड्यावर पोहोचले. उपनिरीक्षक गणेश केदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. अवैध धंद्यांवर चाप ठेवण्याचीही जबाबदारी असलेल्या गुन्हे शाखेला कारवाईतून बाजूला ठेवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...