आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच राज्याला बुधवारी रात्री विजांच्या कडकडासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. यात मराठवाडा आणि विदर्भात वीज पडून एकूण ६ जण ठार झाले. मराठवाडा, विदर्भासह नाशिक जिल्हा, खान्देशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना गारपिटीने झोडपले. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापू,सांगलीतही बुधवारी व गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने राज्यभरात रब्बी पिके भुईसपाट झाली. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभऱ्यावर रातोरात पाणी फेरले गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा उद््ध्वस्त झाल्या. गुरुवारी रात्री कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर हिमवर्षाव झाला. धनगरवाड्यावरील नागरिक भयभीत झाले आहेत. कोकणात पनवेल, कामोठे येथेही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, तर काही भागात गारांचा पाऊस झाला.
जालना-बीडला गारपिटीचा तडाखा, नांदेडात २ ठार
नांदेड/भोकरदन | मराठवाड्यात नांदेड, हिंगोली भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड व जालन्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात माधव दिगंबर वाघमारे (५०), तर चिंचखेड येथे आनंदराव शामराव चव्हाण (६५) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात तडेगाव येथील राहुल रामसिंग सुंदरडे (२७) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
विदर्भ : बुलडाणा, नागपुरातही वीज कोसळून तिघांचा मृत्यू
विदर्भात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. दरम्यान, अंगावर वीज कोसळल्याने बुलडाणा जिल्ह्यात एकाचा आणि नागपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ-वाशीमसह काही ठिकाणी रब्बी पिकांचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात मेळघाटात वीज कोसळून ३ जनावरे दगावली. भंडारा जिल्ह्यात बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच विटांचा कच्चा माल भिजल्याने वीटभट्टीधारकांचे नुकसान झाले.
खान्देश : स्ट्रॉबेरी, मूग, कांदा, भुईमुगाचे अतोनात नुकसान
जळगाव | खान्देशात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले. जळगावात गुरुवारी सायंकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ येथे गुरुवारी दुपारी दोनला आठ ते दहा मिनिटे गारांनी झोडपल्याने स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात कांदा, भुईमूग, गहू,हरभरा मूग, गव्हासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात साक्री शहरासह दहिवेल, कावठे, शेवाळी, कासारे, मालपुर, पेरेजपूर, दातर्ती पाऊस झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.