आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोसळधारा:गणरंगात पावसाचे कमबॅक; राज्याच्या अनेक भागात उद्याही दमदार हजेरी लावण्याची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाच्या आगमनासोबत राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. राज्याच्या अनेक भागात आज दमदार पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात उद्या शुक्रवारीही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये हजेरी

औरंगाबादमध्ये गुरुवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. साधरणतः चार ते साडेचारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी सहापर्यंत सुरू होता. सिडको, हडको, सेव्हन हिल्स्, सातारा परिसर, बीड बायपास, ज्योतीनगरसह इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.

विसर्ग वाढवला

गेल्या 24 तासांत नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. बुधवारी जायकवाडीमधून केवळ अडीच हजार इतका विसर्ग सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता जायकवाडीचे अठरा दरवाजे दीड फुटाणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जायकवाडीतून 28 हजार 296 इतका विसर्ग करण्यात आला आहे.

नगरमध्ये दमदार पाऊस

अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी तीननंतर विजेच्या कडकट्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या अनेक भागात या पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये पाणी घुसले. दरम्यान पुढचे तीन दिवस अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 40 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मध्यम पावसाचा अंदाज

हवामान विभागाने विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 2 सप्टेंबर रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यासह विदर्भातील नागपूर, बुलडाणा, वाशिम, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

- पुणे

- अहमदनगर

- सोलापूर

- बीड

- लातूर

- सांगली

- कोल्हापूर

- सिंधुदुर्ग

- रत्नागिरी

- रायगड

- सातारा

- उस्मानाबाद

- नांदेड

बातम्या आणखी आहेत...