आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे काठाेकाठ, पिकेही पाण्यात:जालना, बीड, नांदेड, परभणीत सोमवारीही पाऊस; माजलगाव, विष्णुपुरीचे दरवाजे उघडले

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र पंकज मोटे व रमेश बोबडे यांनी ड्रोनमधून टिपले आहे. - Divya Marathi
हे छायाचित्र पंकज मोटे व रमेश बोबडे यांनी ड्रोनमधून टिपले आहे.

मराठवाड्यातील जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आदी भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्री व गोंदी या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. दुसरीकडे, बीड, परभणी, नांदेडच्या धरणांच्या साठ्यात मोठी वाढ झाली. माजलगावसह बीड शहराची तहान भागवणाऱ्या तसेच शेतीसाठी बीड, परभणी व नांदेड जिल्ह्यातील गावांना आधार ठरणारा माजलगाव प्रकल्प हा सोमवारी (६ सप्टेंबर) मध्यरात्री पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास या प्रकल्पाच्या १६ दरवाजांपैकी ११ दरवाजे दोन मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले. ८८ हजार ५०० क्युसेक वेगाने या ११ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीत सुरू आहे. विष्णुपुरी धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले.

परभणी : गंगाखेडमध्ये शेतकरी गेला वाहून
सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून बरसल्या. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव (सायाळा) येथील ४७ वर्षीय शेतकरी सुधाकर शेषराव सूर्यवंशी हे इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, ५ ते ६ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत २४ तासांत २०.४ मिमी पावसाची नोंद झाली. पालम तालुक्यातील गळाटी व लेंडी या नद्या दुथडी भरून वाहिल्या. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत नदीपलीकडील १३ गावांचा संपर्क पालमशी झालेला नाही. जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात ९३.३३ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ९३.३५ टक्के भरला. प्रकल्पाच्या चार गेटमधून ८ हजार ६४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात
जिल्ह्यांत सोमवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे सिद्धेश्वर धरण ९९ टक्के तर इसापूर धरण ८७ टक्के भरले. दोन्ही धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडले जाणार आहे.

नांदेड : कुठे जोरदार तर कुठे रिमझिम
जिल्ह्यात सोमवारी जोरदार ते कुठे रिमझिम पावसाने हजेरी लावली. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात कुठे मुसळधार स्वरूपात पाऊस पडत आहे. शेती पिकांना मुबलक पाणी होऊन तलाव, नदी, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. नांदेड, माहूर, भोकर, अर्धापूर, मुदखेडमध्ये दुपारी व सायंकाळी जोरदार तर धर्माबाद, उमरी, हदगाव, हिमायतनगर, नायगाव, किनवट व अन्य तालुक्यांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. विष्णुपुरी प्रकल्पाच्या ८ दरवाजातून गोदावरी नदीपात्रात २ हजार ६९६ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जालन्यात ४ हजार हेक्टरवर नुकसान
गोदावरीच्या पुराचे बॅक वॉटरचे पाणी ओढे-नाल्यांमधून शेतात शिरल्याने घनसावंगी तालुक्यातील रामसगाव शेतशिवाराला तलावाचे स्वरूप आले आहे. शिवारातील शेकडो एकर क्षेत्रात सध्या पाणीच पाणी दिसून येत आहे. जमिनीही खरडून गेल्या आहेत.
- जालना जिल्ह्यात आठवडाभरात तीन वेळा अतिवृष्टी होऊन २६ मंडळांतील पिकांची नासाडी झाली. पंचनामे सुरू आहेत.
- एकट्या जालना तालुक्यात ५ सप्टेंबर सायंकाळी व रात्री चार मंडळांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४ हजार ३८३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

बातम्या आणखी आहेत...