आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाऊस:मराठवाड्यातील पाच मंडळांत पावसाने नुकसान, 326 मंडळांत हलका ते मध्यम पाऊस

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • ढगफुटीच्या ठिकाणी असे असते वातावरण

सोमवारी चित्तेपिंपळगाव ११७ मिमी, करमाड ७४, सोयगाव ८३, वडोदबाजार ७८ आणि बदनापूर ८२ मिमी अशा पाच मंडळात अतिवृष्टी झाली. उर्वरित ३२६ मंडळांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. जेथे पोषक वातावरण तयार होते तेथेच ढग फुटी होत आहे. उर्वरित मंडळात हलक्या स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. अतिपावसाने शेतातील माती व पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तर कमी पावसाच्या आगमनाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय. पण जुलैचा पंधरवडा पूर्ण होत असतानाही प्रकल्प मात्र तहानलेले आहेत.

यंदा मराठवाड्यात १ ते ३० जूनपर्यंत सरासरी १३४ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत २०३.१ मिमी म्हणजे १५१.६ टक्के पाऊस पडण्याचा विक्रम झालाय. मात्र, जुलैतील १२ दिवसांत ४२१ पैकी १४ मंडळ अपवाद वगळता मोठा पावसाने हुलकावणी दिली. तर १३ जुलै रोजी देखील अशाच प्रकारे केवळ पाच मंडळात धो धो पाऊस पडलाय. उर्वरित मंडळात अत्यल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.  म्हणजेच जेथे तापमान, कमी हवेचा दाब, सापेक्ष आर्द्रता १०० टक्के, ढगांची गर्दी होते, तेथेच मुसळधार पाऊस पडत असून उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. म्हणजेच जेथे अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडतोच तो पिकांसाठी घातक ठरतोय व कमी पाऊस देखील कुचकामी ठरत आहे. अतिपावसाच्या ठिकाणी पिक पिवळी पडत आहेत. तर कमी पावसाच्या ठिकाणी पावसाच्या आगमनाने पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. पण त्या पिकांची वाढ बरोबर होत नाही. शेताच्या मातीचा वरचा पापुद्रा भिजतोय. त्यामुळे ओल खोलवर जात नाही. दोन दिवसांचा खंड पडला व ऊन तापायला लागले की, पीक माना टाकतात. मध्यम स्वरूपाच्या जेथे पाऊस पडतोय तेथील पीक बहरली आहेत.

एकूण पर्जन्यमान : १ जून ते १३ जुलैपर्यंत २१८.१ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत २७९.३ मिमी म्हणजेच १२८.१ टक्का पर्जन्यमान झाले आहे. जुलैच्या १३ दिवसांत खूप कमी पाऊस पडल्याने टक्केवारीत घसरण झालेली आहे.

१३ जुलैच्या पावसाचा आलेख : औरंगाबाद १७.५, जालना ६.७, बीड २.१, लातूर १.३, उस्मानाबाद ०.१, नांदेड ०.३, परभणी ०.१, हिंगोली १.९ मि.मी, असा एकूण सरासरी ४.१ मिमी पाऊस झाला आहे.

आज पाऊस !

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. १५ जुलै रोजी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई कुलाबा वेध शाळेने वर्तवला आहे. हा पाऊसही जेथे पोषक वातावरण तेथे धो धो व जेथे अभाव तेथे अत्यल्प होईल. जेथे जास्त पाऊस होणार आहे, तेथील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

ढगफुटीच्या ठिकाणी असे असते वातावरण

तीव्र कमी हवेचा दाब १००२ ते १००६ हेक्टा पास्कलपर्यंत, सापेक्ष आर्द्रता १०० %, बाष्पयुक्त काळेकुट्ट ढगांचे आच्छादन, सूर्य चांगलाच तळपतो, तापमान पोषक असते अशा ठिकाणी अतिवृष्टी किंवा☁️ ढगफुटी होते. तर हे ढग पुढे खेचून नेण्यासाठी अपोषक वातावरण राहात असल्याने दुसरीकडे अत्यल्प पाऊस होतो. पावसाला हुलकावणी मिळते.