आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:सोमवारपासून मराठवाड्यासह विदर्भातही पाऊस, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सूर्य तळपू लागला आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतोय. यामुळे ३० ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत मराठवाडा, विदर्भात पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प ११.९ मिमी पाऊस पडला होता. १६ ते २३ ऑगस्टदरम्यान कुठे धो धो तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आठ दिवसांत १०० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे खरीप पिके तगली. मात्र, काढणीस आलेले मूग, उडीद पिकांचे नुकसान केले. गत चार दिवसांत जेथे पोषक वातावरण तयार होते तेथेच हलका पाऊस पडला. उर्वरित ठिकाणी पावसाचा थेंबही पडलेला नाही. १ ते २७ ऑगस्ट दरम्यान १६८.४ मिमी सरासरी पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत १२३.५ मिमी म्हणजे ७३.३ टक्के पाऊस पडला. मान्सूनचे तीन महिने संपत आले असून मराठवाड्यातील ८७९ पैकी ३० लघु प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. २५० प्रकल्प जोत्यात तर दोनशेवर प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.

यंदाही २०.६%जास्त पाऊस
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १ जून ते २७ ऑगस्टपर्यंत सरासरी ४८८.६ मिमीच्या तुलनेत ५८९.४ मिमी म्हणजे १२०.६ टक्के जास्त पाऊस पडण्याची नोंद महसूल, कृषी आणि हवामान विभागाने घेतली आहे. असे असले तरी मंडळ, गाव, तालुकानिहाय पावसाचे प्रमाण ५० ते ९० टक्क्यांदरम्यान कमी-जास्त आहे. कमी पावसाच्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस
मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सुरू होईल. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतरही सुरूच राहील. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, कर्नाटकसह संपूर्ण दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. उत्तर भारतात पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...