आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोसळल्या जलधारा:सरींनी मराठवाडा चिंब, धरणांची वाटचाल शंभरीकडे, शेतांमध्ये पाणीच पाणी; परभणी, नांदेड, हिंगोलीतही हजेरी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात साेमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. जालना जिल्ह्यात १५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने शेतीला फटका बसला. आठपैकी सहा तालुक्यांत पाणीच पाणी झाले. एका दिवसात तब्बल ४४.८० मिमी पाऊस झाला. तर जालना ग्रामीण, पाचनवडगाव, रामनगर, विरेगाव, शेवली, नेर, पांगरी, ढोकसाळ, तळणी, रांजणी, घनसावंगी, सातोना, श्रीष्टी, वाटूर तसेच परतूर मंडळात अतिवृष्टी झाली.

परभणी जिल्ह्यात २० सप्टेंबरला रात्री १० च्या सुमारास सुमारे १ तास जोरदार पाऊस झाला. मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात पाटोदा, बीड, केज, यासह माजलगाव परिसरामध्ये पावसाची हजेरी राहिली. नांदेड जिल्ह्यातही पावसाचे मध्यम स्वरूपात हजेरी लावली. हिंगोली शहरासह जिल्हाभरात मंगळवारी २४ तासांत एकूण सरासरी १३ मिमी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव, फुलंब्री तालुक्यातही पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले. चिंचोली लिंबाजी येथेही पाऊस झाला.

ऑक्टोबरपर्यंत असेल पाऊस
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आपल्याकडे पाऊस घेऊन येत आहे. पुढील पाच दिवस मान्सूनचा पाऊस पडेल. अति पाऊस खूप नुकसान करत आहे. तसेच हवेच्या दाबाचा पट्टा कमी झाला तर १ आॅक्टोबरला परतीचा मान्सून दाखल होऊन २० आॅक्टोबरपर्यंत अधूनमधून पाऊस पडेल. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामानशास्त्रज्ञ.

‘येलदरी’सह निम्न दुधना धरणातून विसर्ग सुरू
परभणी जिल्ह्यातील धरण आणि प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भागवणारे येलदरी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे येलदरी धरणातून मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पूर्णा नदीपात्रात पण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे गेट क्रमांक १, ५, ६ आणि १० हे दरवाजे अर्ध्या मीटरने उचलण्यात आले. त्यातून ८ हजार ४३९.८१ क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी २ हजार ७०० क्युसेक असा एकूण ११ हजार १३९.८१ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. तर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पही १०० टक्के भरला. मंगळवारी सकाळी प्रकल्पाच्या १४ गेट ०.६० मीटरने उघडण्यात आले. नदीपात्रातून ३० हजार ३२४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. शिवाय जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रावरील ढालेगाव, तारुगव्हाण, मुद‌्गल या तिन्ही बंधाऱ्यांतूनसुद्धा गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

बीड : सलग दुसऱ्या वर्षी मांजरा तुडुंब
केज | बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच शहरांसह अनेक गावांची तहान भागवणारे धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण हे २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता १०० टक्के भरले. तर २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेचे धरण गतवर्षी परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाले होते. यंदा सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. आता धरण भरल्याने पाण्याची आवक सुरू असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...