आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुलै संपत आला तरी राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात चिंता व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाची मोठी तूट पडली आहे, तर पुणे विभागातील धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. परिणामी कोकणात हा आठवडा जोरदार पावसाचा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
यंदा मान्सूनने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांकडे पाठ फिरवली आहे. नाशिक विभागात १९ जुलैअखेर २७३.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना २१२.२ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात या विभागात ३०४.३ मिमी पाऊस झाला होता.
नाशिक विभागातील प्रमुख धरणांत गतवर्षी १९ जुलैअखेर ३५.२७ टक्के पाणीसाठा होता, यंदा तो केवळ २९ टक्के आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या मराठवाड्यात चिंता व्यक्त होत आहे.
मुंबईसह कोकणाला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट : मान्सूनचा आस सध्या मध्य भारतात असून कोकण किनारपट्टी ते कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. या मुळे कोकणसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत २० ते २३ जुलै या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (६४.५ ते २०४ मिमीपर्यंत पाऊस) जारी केला आहे. याच काळात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्य पावसाची तर विदर्भात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. सोमवारी कुर्ला आणि ठाणे मनपा हद्दीत कळवा येथे दरड कोसळून ५ रहिवाशांचा बळी गेला. मुंबई शहरात सोमवारी ३०.६९ मिमी, पूर्व उपनगरात ४७.८२ मिमी, तर पश्चिम उपनगरात ६१.३६ मिमी पाऊस पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.