आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आभाळमाया:चौदा वर्षांचा वनवास संपला, येलदरी तुडुंब! 10 दरवाजे उघडले; पूर्णा नदीस पूर, जायकवाडीही 66 टक्क्यांवर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यावर आभाळमाया; सिद्धेश्वर भरले, जायकवाडीही 66 टक्क्यांवर

गेल्या सहा ते सात दिवसांपासून मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी, नांदेड आणि जालना या पाच जिल्ह्यांत संततधार कायम आहे. जालना जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी जोरदार वृष्टी झाली. हिंगोली, परभणीसह नांदेड जिल्ह्यातही सात दिवसांपासून जलधारा कोसळत आहेत.

लाभक्षेत्रात पाऊस

औरंगाबाद शहराची तहान भागवणारे पैठण येथील जायकवाडी धरण सुमारे ६६ टक्के भरले आहे. लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढू लागली आहे.

येलदरीचे १० दरवाजे उघडले; पूर्णा नदीस पूर

परभणी जिल्ह्यात येलदरी धरण १४ वर्षांनंतर भरले आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये हे धरण भरले होते. सध्या १६,८०० क्युसेकने पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा नदीस पूर आला.

गंगापूर धरण ८२% भरले : नांदूर-मधमेश्वरमधून १४ क्युसेक विसर्ग

नाशिक | २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७०.९६ मिमी पाऊस पडला. त्यात त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भागातच प्रत्येक ४३ मिमी, अांबोली ४८ मिमी, गंगापूर धरण परिसरात ३५ आणि कश्यपी धरण परिसरात ५० मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण ८२ टक्के भरले असून, दुसऱ्या बाजूने दारणा ९२ टक्के भरल्याने त्यातून ८ हजार क्युसेकने आणि नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून सायंकाळी १४ हजार २३४ क्सुसेकने विसर्ग सुरूच आहे. मुसळधार पावसाने नद्या खळाळून वाहत आहेत.

सांगली पूरपट्ट्यातील १० हजार नागरिकांचे स्थलांतर सुरू

सांगली | कृष्णा खोऱ्यातील सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून ५६,४३१ क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने सांगलीत कृष्णा नदीने ३६ फूट पाण्याची पातळी गाठली आहे. कोयना, वारणा, धोम, कण्हेर, राधानगरी आदी धरणांच्या क्षेत्रात सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत हाेता. कोयनेची साठवण क्षमता १०५ टीएमसी असून सोमवारी दुपारी २ वाजता ९३ टीएमसी पाणीसाठा साठा होता. कोयना धरणाचे ६ दरवाजे १० फूट उंचीने उचलण्यात आले आहेत.

इशारा पातळी ओलांडली : पंचगंगा पात्राबाहेर, कोल्हापुरात पूरस्थिती

कोल्हापूर | गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरणक्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या चिखली गावातील गावातील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून ७,११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर अलमट्टी धरणातून २.५० लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंचगंगेने ३९ फूट इशारा पातळी ओलांडली असून आता धोका पातळीकडे (४३ फूट) जाण्याची भीती आहे.

सांगली-भिलवडी राज्यमार्ग बंद

कोयनेसह सर्व धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत. सांगलीजवळ असलेल्या शेरीनाल्यातून कर्नाळ रोडपर्यंत पाणी आल्याने सांगली-भिलवडी हा राज्यमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. सांगलीच्या पूरपट्ट्यातील १० हजार कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे. महापालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...