आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा हवालदिल:पावसाची हुलकावणी, पेरणी संकटात; औरंगाबाद क्षेत्रात 2.60% तर लातूर विभागात फक्त 1.45% पेरणी

औरंगाबाद | संतोष देशमुखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात २० जूनपर्यंत ६८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. मोजक्याच ठिकाणी धो-धो तर बहुतांश ठिकाणी अत्यल्प पाऊस पडला. परिणामी औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात २० लाख ८० हजार ६५२.५ सरासरी हेक्टरपैकी ५४ हजार १८२ हेक्टर म्हणजेच केवळ २.६० टक्के तर लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात २९ लाख १९ हजार १४८ हेक्टरपैकी ४२ हजार २४२ हेक्टरवर म्हणजेच १.४५% प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे.

गतवर्षी १५.८४ टक्के पेरणी झाली होती. पेरणी योग्य पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी पाऊस येणारच या आशेवर धूळ पेरणी करून ठेवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होत चालले आहे. हवामान विभाग, खासगी हवामान संस्था, हवामान शास्त्रज्ञांनी यंदा आठ ते दहा दिवस अगोदर मान्सून दाखल होईल व सरासरी इतका आणि त्यापेक्षा ५ टक्के जास्त पर्जन्यमान होण्याचे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला. विभागात येथे अत्यल्प पाऊस (मिमी)

शहर पाऊस
कळमनुरी ३६.३
परभणी ३८.४
पूर्णा ४७
नांदेड ३८.९
बिलोली ५१
हदगाव ४१.७
हिमायतनगर ४७.४
धर्माबाद ३३.६
अर्धापूर ४३.९
नायगाव खुर्द ५०
उस्मानाबाद ३३
परंडा ९.४
भूम ४२
कळंब ३४

शहर पाऊस
लातूर ३३.९
औसा ४६
निलंगा ३९.१
दावणी ५२
बीड ३९.९
आष्टी ४२
अंबाजोगाई ४३.६
औरंगाबाद ५२
फुलंब्री २७
सोयगाव ३७.८
सिल्लोड ३५.८
भोकरदन ४३
जालना ३९
परतूर ३२.४

दुबार पेरणीचे संकट
२० जूनपर्यंत मराठवाड्यात ८९.३ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ६१.३ मिमी म्हणजेच ६८.६ टक्केच पाऊस पडला आहे. परिणामी खरीप पेरणीचा खोळंबा झाला आहे. जेमतेम २ टक्के पेरणी व लागवड झाली तेथील पिके उगवण क्षमतेवर परिणाम झालेला आहे. जमिनीत ओलावा कमी आहे. उष्णता, आर्द्रता वाढलेली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या उगवण शक्तीला वातावरण मारक ठरत आहे. त्यात अपेक्षित पाऊस पडत नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेड : हिमायतनगर तालुक्यात ढगांची गर्दी होत असून पाऊस हुलकावणी देत आहे. छाया : अनिल मादसवार.
आतापर्यंत ८९.३ मिमी पाऊस अपेक्षित, प्रत्यक्षात ६१.३ मिमीची नोंद

खरीप पेरणीची घाई नको

जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडतोय. जमिनीतील ओलावा २ ते अडीच फूट खोलवर जेथे गेला आहे, तेथे पेरणी करण्यास चालते. मात्र, जमिनीत अत्यल्प ओलावा आहे. वरून सूर्य तळपतो आहे अशा ठिकाणी पेरणी व लागवड करणे धोक्याचे असून अपोषक वातावरणाचा बियाणे उगवण्यावर परिणाम होऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये. - दिनकर जाधव, कृषी सहसंचालक, औरंगाबाद.