आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:सरासरीपेक्षा दोनशे टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस, इमारतीवर रेन हार्वेस्टिंगचे प्रमाण केवळ चार टक्केच

संतोष देशमुख । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात २०१७ ते २०२२ या सहा वर्षांपैकी चार वर्षे सरासरी ५७५ मिमीच्या तुलनेत दीडपट ते दुप्पटपेक्षा जास्त पाऊस पडला. हा पाऊस आपल्याला साठवून ठेवता आला नाही. याचे कारण म्हणजे शहरातील ३ लाखांपैकी केवळ १२ हजार म्हणजे ४ टक्के इमारतीवरच रेन वाॅटर हर्वेस्टिंग आहे. त्यामुळे २५० किमी परिसरातील ९६ टक्के इमारतीच्या छतावर पडणारे पाणी वाहून जात आहे. परिणामी पाणीटंचाईचे संकट संपत नाही.

गत सहा वर्षांपासून शहराच्या २५० किमी परिसरात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पडलेल्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद आहे.त्यानुसार चार वर्षे धो-धो, तर दोन वर्षे १.४० ते ४.३३ टक्केच कमी पाऊस पडलेला आहे. पण जलपुनर्भरण होत नसल्याने दरवर्षी पावसाचे पाणी नदी-नाल्यातून वाहून जाते. परिणामी शहर परिसरातील पाण्याची समस्या मनपा प्रशासन व नागरिकांनाही सोडवता आलेली नाही. उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनंतर आणि पावसाळ्यात पाच दिवसांआड पिण्याचे पाणी मिळते. यामुळे शहरवासीय हैराण आहेत. दुष्काळात याचा सर्वाधिक फटका बसतो.

दीर्घकालीन परिणाम : जास्त पाऊस पडूनही जलपुनर्भरण उपाययोजना केलेली नसल्याने पावसाचे पाणी दरवर्षी वाहून जात आहे. जलपुनर्भरण अत्यल्प व उपसा अमर्याद असल्याने लहान -मोठी धरणे, जलाशय दरवर्षी तळाला जातात. शहरात बारमही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. भूजलपातळी खालावत चालली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अपयशाची प्रमुख कारणे
मालमत्ताधारकास हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे. पण अंमलबजावणी होत नाही. काही नागरिक इमारतीवर हार्वेस्टिंग करतात, पण मनपाकडे नोंद करत नाहीत. तर मनपाकडून सर्वेक्षण करून यातील वास्तव जाणून घेतले जात नाही. ज्यांनी हार्वेस्टिंग केले नाही त्यांनी ते का करावे? यासाठी जनजागृती करत नाही. पाण्यासाठी टाहो फोडणारे लोक जलपुनर्भरणाविषयी जागरूक नाहीत. अशा विविध कारणांमुळे हार्वेस्टिंगचे प्रमाण अतिशय नगण्य दिसून येते.

वर्ष पर्जन्यमान टक्केवारी
२०१७ ८२६.५ मिमी १४३.७३
२०१८ ५६७.५ ९८.६९
२०१९ ५५०.७ ९५.७७
२०२० १३५८.२ २३६.२०
प्रथमच रेकॉर्डब्रेक पर्जन्यमान
२०२१ ८५४.५ १४८.६०
२०२२ ७२६.६ १२३.३६

१२०० कोटी लिटर पाणी मुरले असते
१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत ७२६.६ मिमी पर्जन्यमान झाले आहे. त्यानुसार एकाच २ हजार स्क्वेअर फूट इमारतीवरील १ लाख ४२ हजार लिटर पाणी पडले. तर त्यातून १ लाख लिटर पाणी जमिनीत मुरले. सहा हजार मनपाचे व सहा हजार नोंदणी नसलेले असे एकूण १२ हजार मालमत्तांनी वाॅटर हार्वेस्टिंग केले असे गृहीत धरून १२० कोटी लिटर जलपुनर्भरण झाले आहे. मात्र, ९६ टक्के मालमत्तांनी रेन हार्वेस्टिंग केलेले नाही. ही सोय केली तर १० पट म्हणजे १२०० कोटी लिटर पाणी मुरू शकते. भूजल पातळीत वाढ होऊ शकते, अशी माहिती जलतज्ज्ञ विजय केडिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...