आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून ठरलेल्या वेळी एक जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. पृथ्वी विज्ञान मंंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मान्सूनच्या अंदाजाबाबतचा सविस्तर अंदाज आयएमडी येत्या १५ मे रोजी जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात यंदा सात जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. यंदा राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आयएमडीने एप्रिलमधील आपल्या पहिल्या दीर्घावधी अंदाजात वर्तवली आहे, तर स्कायमेट या खासगी संस्थेने याच काळात देशात १०३ टक्के पाऊस होईल, असे म्हटले आहे. देशात सरासरी ८८० मिमी मान्सूनचा पाऊस होतो. या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांपर्यंतचा पाऊस सरासरीइतका मानला जातो. आयएमडी ३१ मे रोजी दुसरा दीर्घावधी अंदाज जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र : सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता
1. आयएमडीनुसार, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान जास्त राहील. पूर्व मोसमी हंगामात अरबी समुद्रात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. वाऱ्यांची दिशा व पॅटर्न राज्यासाठी अनुकूल स्थितीत.
2. सध्या मध्य प्रदेश ते मराठवाडा असा कमी दाबाचा पट्टा आहे. दक्षिण अरबी समुद्रात एप्रिल व मे महिन्यात मान्सूनच्या पेरणीसाठीचे अनुकूल बदल दिसत असून राज्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे.
यंदा मान्सून सरासरी गाठणार
यंदा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. एप्रिल- मेमधील तापमान, जानेवारीपासूनचे हवामान लक्षात घेता या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल. केरळात मान्सून एक जूनपूर्वीही दाखल होऊ शकतो, तसेच महाराष्ट्रात मान्सून सात जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष चांगल्या पावसाचे राहील. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पाऊस सरासरी गाठेल. काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. -डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ
ला-निना, आयओडी, एमजेओ अनुकूल, ढगनिर्मितीस पोषक
देशात सध्या मान्सूनचे बीजारोपण अनुकूल स्थितीत सुरू अाहे. आयएमडीच्या ताज्या अहवालानुसार, सध्या ला - निना मॉडरेट स्थितीत आहे, तर इंडियन ओशन डायपोल -आयओडी सध्या न्यूट्रल स्थितीत आहे, मे, जून आणि जुलैमध्ये आयओडी न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मेडेन ज्युलियन ऑसिलेशन -एमजेओ निर्देशांक हा सध्या फेज एक या स्थितीत आहे. तो ११ मेनंतर तो तिसऱ्या फेजमध्ये राहील. हे सर्व घटक मान्सूनच्या बीजारोपणासाठी अनुकूल असून त्यामुळे दक्षिण अरबी समुद्रात पावसाळी ढग निर्मितीस चालना मिळणार आहे.
ला-निना : प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सियसने कमी राहते. बाष्पयुक्त मोसमी वारे भारतीय उपखंडाकडे वाहतात. सध्या मॉडरेट. मान्सूनसाठी चांगला.
आयओडी : यास भारतीय निनो असेही म्हणतात. हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील (डायपोल) तापमान दर्शवणारा घटक. सध्या न्यूट्रल, मान्सूनसाठी चांगला.एमजेओ : महासागरांवरून एका विशिष्ट दिशेला प्रवास करणारी हवामान प्रणाली आहे. मान्सूनच्या काळात एमजेओ जर हिंदी महासागरावर असेल तर भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.