आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट कायम:आगामी 5 दिवस अवकाळी पावसाचे वातावरण; राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह पाऊस, बीडमध्‍ये वीज पडून 1 ठार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठवाड्यात बीड जिल्ह्यास अवकाळी आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. रविवारी ढगाळ वातावरणामुळे छत्रपती संभाजीनगरात तापमानात घसरण होऊन ३४.८ अंशांवर आले. सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर या परिसरात २० मिनिटे गारपीट झाली.

बीड : २०७६ हेक्टरचे नुकसान, कृषिमंत्री सत्तारांनी केली पाहणी

फेब्रुवारी-मार्च महिन्यातील नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झालेले नसतानाच दोन दिवसांत अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. ४ हजार ३२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

वादळी पाऊस, गारपिटीत आष्टी तालुक्यात वीज पडून एक जण ठार, तर माजलगावात दाेन जण जखमी झाले. २० जनावरे दगावली. केज, बीड व पाटोद्यात सर्वाधिक नुकसान झाले. एकट्या केजमध्ये दीड हजार हेक्टरवरील पिके उद््ध्वस्त झाली आहेत. नुकसानीची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. पंचनामे सुरू झाले असून शासनाकडून भरपाईचे आश्वासन त्यांनी दिले.

विदर्भात विजांसह वादळी वारा, उर्वरित राज्यात विजांसह पाऊस

आज विदर्भात जोरदार वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस, गारपिटीने राज्याच्या विविध भागात तडाखा दिला आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १०) विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. अनेक ठिकाणी पहाटे गारवा जाणवत आहे.