आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादमध्ये आज मंगळवारी पेट्रोलचे दर 108 रुपये असताना क्रांती चौकातील पंपावर ते चक्क 54 रुपये प्रति लिटरने मिळाले. त्यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केली. प्रचंड वाढलेल्या महागाईच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबवलेला हा अफलातून उपक्रम चर्चेचा विषय ठरला.
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज औरंगाबादेत मनसेकडून वाहनचालकांना फक्त 54 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री करण्यात आली. क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर सकाळी 8 ते 9 दरम्यान मनसेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. मात्र, गर्दी वाढल्यानंतर ही वेळही वाढवण्यात आली. या संधीचा शहरातील अनेक वाहनधारकांनी लाभ घेतला. स्वस्त दराने पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. त्यामुळे क्रांती चौकातील पेट्रोल पंपापासून ते सिल्लेखाना चौकापर्यंत वाहनचालकांच्या रांगा लागल्या. मनसेच्या या उपक्रमाबाबत वाहनचालकांनीही आनंद व्यक्त करत आज किमान काही रुपयांची तरी बचत झाल्याचे समाधान व्यक्त केले.
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबादेत आज सकाळी 10 वाजता सुपारी हनुमान गुलमंडी येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली. तर, आज पहाटे साडे पाच वाजता मनसे कार्यकर्त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जमून अभिषेक केला. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गजानन महाराजांची आरती करुन राज ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना केली. मनसे कामगार सेनेतर्फे फोर्ट येथील विजू कोटक मार्गावर 'हिंदुजननायक चषक' दिवस- रात्र क्रिकेट सामन्यांची स्पर्धा आयोजित केली होती.
राज कोणालाही भेटणार नाहीत
राज ठाकरे सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे ते आज कोणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे मनसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी 'शिवतीर्थ'वर येऊ नये, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, सोमवारी रात्री मनसैनिकांनी शीवतीर्थाबाहेर जल्लोष केल्यानंतर राज ठाकरे काही वेळासाठी गॅलरीत आले होते. त्यांनी मनसैनिकांच्या दिशेने हात उंचावत शुभेच्छांचा स्वीकार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.