आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण:एकाच निकटवर्तीयाने टोकाच्या द्वेषातून प्रा. शिंदेंना संपवले, सहाव्या दिवशी तपास अंतिम टप्प्यात

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. राजन शिंदेंची हत्या त्यांच्या एकाच अत्यंत निकटवर्तीयाने अत्यंत टोकाच्या द्वेषातून केली, या निष्कर्षापर्यंत पोलिस शनिवारी पोहोचले. मारेकऱ्याने झोपेत असलेल्या शिंदेंच्या डोक्यात एका जड वस्तूने (लोखंडी रॉड किंवा हातोडा नाही) सलग पाच वार केले. त्यात त्यांचा प्राण गेल्याचे लक्षात आल्यावरही त्याचा द्वेष संपला नव्हता. त्याने धारदार नव्हे तर बोथट हत्याराने गळा, हाताच्या नसा ओबडधोबड कापल्या. हत्यारे घराजवळच्या विहिरीतच फेकली, असाही कयास आहे. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू होता. रविवारी हत्यारे मिळाली तर रविवारी ठोस कारवाई होऊ शकते, असे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्थापन केलेली एसआयटी शनिवारी मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. मारेकऱ्याने कबुलीजबाबही दिला, मात्र सबळ पुराव्याअभावी पोलिस थांबल्याचे समजते.

यामुळे अधिक स्पष्ट
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याची एन-४ मधील हनुमान मंदिराजवळील पोलिस चौकी सोमवारपासून एसआयटी व इतर तपासाचे प्रमुख केंद्र होती. तेथेच शुक्रवारी प्रमुख, वरिष्ठ अधिकारी रात्री दहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी ठाण मांडून होते. शनिवारी दुपारी तपास अंतिम टप्प्यात आला आणि तेथे अधिकारी, कर्मचारी मारेकऱ्याव्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यांचा जबाब, घटनाक्रमाची कागदावर नोंदणी करू लागले. पाच दिवस गजबजलेल्या चौकीत शनिवारी सायंकाळी नीरव शांतता होती. वरिष्ठ अधिकारी विहिरीजवळ होते.

‘त्याचा’ शिंदेंशी सतत वाद
शिंदे यांचा मारेकरी त्यांचाच अत्यंत निकटवर्तीय आहे. यात आणखी कोणी सहभागी आहे का, या दिशेने पोलिस तपास करत होते. मात्र, मारेकरी एकच असून शिंदेंशी त्याचा सतत वाद होत होता. त्यातून निर्माण झालेल्या टोकाच्या द्वेषातून मारेकऱ्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने कुटुंबातील इतर सदस्यांना सोबत नेऊन त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून त्यांना घरी पाठवून देण्यात आले.

दोन्ही मुले मोठी तरीही प्रा. मनीषांची चार वेळा १२३ दिवसांची बालसंगोपन रजा
घरातच अतिशय निर्घृणपणे खून झालेल्या प्रा. राजन शिंदे यांच्या पत्नी प्रा. मनीषा शिंदे यांची दोन्ही मुले १५ वर्षांपेक्षा मोठ्या वयाची आहेत. तरीही त्यांनी दोन वर्षांत १२३ दिवसांची बालसंगोपन रजा घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या प्रा. मनीषा यांनी अशी रजा घेण्यामागे नेमके कारण काय आहे, याकडे पोलिसांनी कानाडोळा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पतीचा मृतदेह सकाळी सात वाजता पाहिल्याचे प्रा. मनीषा सांगतात. पण उस्मानाबाद उपकेंद्रातील सहायक प्राध्यापकाला त्यांनी पहाटे पाच वाजताच फोन करून पतीचा खून झाल्याचे सांगितले होते.

उस्मानाबाद उपकेंद्र २००४ दरम्यान सुरू झाले. त्यात ५ नोव्हेंबर २००४ रोजी प्रा. मनीषा शिंदे शिक्षणशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या होत्या. २ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सहयोगी प्राध्यापकपदी पदोन्नती मिळाली. तत्पूर्वी त्यांनी तीन वर्षे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात बदली करून घेतली होती. विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र विभाग विनाअनुदानित असताना अनुदानित प्राध्यापकाची बदली कशी केली, असा सवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्या वेळी विचारण्यात आला होता. त्यामुळे २०११ दरम्यान त्यांना पुन्हा उस्मानाबादला पाठवले होते. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह होता, अशी विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. जुलै-२०१८ दरम्यानच्या शासन निर्णयानुसार ज्यांचा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना बालसंगोपन रजा दिली जाते. प्रा. मनीषा यांनी या शासन निर्णयाचा आधार घेऊन चार वेळा बालसंगोपन रजा घेतली. पहिली रजा २३ दिवसांची आहे. १ मार्च २०१९ ते २३ मार्चपर्यंत त्या उस्मानाबादला नव्हत्या. दुसरी रजा ३७ दिवसांची असून २४ जून २०१९ ते ३० जुलै २०१९ पर्यंत त्या उस्मानाबादला नव्हत्या. २७ नोव्हेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यानच्या ३५ दिवस पुन्हा त्या रजेवर गेल्या होत्या. या वर्षात १९ एप्रिल २०२१ ते १६ मे २०२१ पर्यंतच्या २८ दिवस त्यांनी रजा घेतली. सेवाकाळात १८० दिवसांच्या प्रसूती रजेखेरीज आणखी १८० दिवसांची बालसंगोपन रजा घेता येते. प्रा. मनीषा यांनी १८० पैकी १२३ दिवसांची रजा घेतल्याची विद्यापीठ आस्थापना विभागात नोंद आहे.

आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळू : आघाव
अनेक गंभीर गुन्ह्यांत सबळ पुरावा मिळाला नाही तर परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे संंशयितांना ताब्यात घेतले जाते. नंतर संशयितांना पोलिसी खाक्या दाखवून कबुलीजबाब वदवून घेतला जातो. प्रा. शिंदे प्रकरणात ही पद्धत वापरली गेली नाही. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले, ‘गुन्हा उघडकीस आणण्यात काही अडचणी होत्या. पण आता आम्ही आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नाही. फक्त रविवारपर्यंत वाट पाहा.’

या पुराव्यांकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष?
१.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हत्यारे दाखवण्यासाठी ज्या विहिरीजवळ मुलगा रोहित पोलिसांना घेऊन गेला होता, त्या विहिरीचे सहाव्या दिवशी (शुक्रवारी) रात्रभर तीन मोटारी लावून पाणी उपसले जात होते. हा निर्णय घेण्यासाठी पोलिसांनी सहा दिवसांचा वेळ का दवडला?
. प्रा. मनीषा शिंदे यांनी पोलिसांच्या जबाबात मृतदेह सकाळी सात वाजता पाहिल्याचे म्हटले. प्रत्यक्षात उस्मानाबाद उपकेंद्रातील सहायक प्राध्यापकाला पहाटे पाच वाजताच त्यांनी फोन करून पतीचा खून झाल्याचे सांगितले. या तफावतीकडे तपासी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?
३. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. असे असताना अल्पवयीन म्हटला जाणारा मुलगा रोहित आणि मुलगी चैताली पहाटे रुग्णवाहिकेसाठी गेले, यावर पोलिसांचा विश्वास का बसला?
४. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता साडेचार तास गुन्ह्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते, तरीही काहीच धागा हाती का लागला नाही?
५. शिंदे दांपत्याने घटस्फोटाची नोटीस दिली, असे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले. हा क्ल्यू पोलिसांनी लक्षात का घेतला नाही?

बातम्या आणखी आहेत...