आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण:दोन दिवस पाणी उपसा करूनही विहिरीतील पुरावे हाती लागेनात; मारेकरी स्पष्ट, पण पुराव्याअभावी सस्पेन्स

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येला रविवारी आठ दिवस झाले. या काळात वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून पाेलिस मुख्य आराेपी ओळखण्यापर्यंत पाेहाेचले आहेत. प्रचंड द्वेषातून निकटवर्तीयांपैकी एकानेच प्रा. शिंदेंची हत्या केल्याची कबुलीही पाेलिसांकडे दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र ठाेस पुरावे हाती न लागल्याने पाेलिसांनी अद्याप आराेपीचे नाव जाहीर केलेले नाही. मारेकऱ्याने शिंदेंच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, चाकू, कटर आणि रक्ताने माखलेला टाॅवेल जवळच्या विहिरीत टाकल्याचा पाेलिसांना दाट संशय आहे. त्यानुसार शनिवारपासून या विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण पाणी उपसा हाेऊ न शकल्याने हे पुरावे पाेलिसांच्या हाती लागले नाहीत.

प्रा. राजन शिंदे हे त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकाचा नेहमीच ‘ढ’ म्हणून पाणउतारा करायचे. वारंवार हाेत असलेला हा अपमान सहन न झाल्याने संबंधित निकटवर्तीयाच्या मनात शिंदेंबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला हाेता. यातून त्यांच्यात फारसे संभाषणही हाेत नव्हते. १० ऑक्टाेबर राेजी रात्रीही या दाेघांमध्ये असाच टाेकाचा वाद झाला हाेता. रात्री दीड वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. मध्यरात्री शिंदे बैठक खोलीत झोपी गेले. हीच संधी साधून निकटवर्तीयाने त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. सुरुवातीला प्राथमिक तपास करतानाच पाेलिस या निष्कर्षापर्यंत पाेहाेचले हाेते, मात्र त्यांच्या हाती पुरावे नव्हते. तसेच चाैकशीतही निकटवर्तीयांकडून मागमूस लागू दिला जात नव्हता. मग पाेलिसांनी तांत्रिक व भावनिक तपास सुरू केला. निकटवर्तीयांची स्वतंत्रपणे चाैकशी केली, त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली तेव्हा संशय पक्का झाला. दाेन दिवसांपूर्वीच पाेलिस मारेकऱ्याला ओळखण्यात यशस्वी झाले, पण पुरावे हाती नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यास पाेलिसांनी वेळ घेतल्याचे सांगितले जाते.

पाण्याचा उपसा सुरूच : शिंदेंना मारण्यासाठी वापरलेले डंबेल्स, चाकू, कटर आणि हत्येनंतर रक्ताने माखलेला टॉवेल आराेपीने विहिरीत फेकल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने पाेलिसांनी शिंदेंच्या घरापासून जवळच असलेली या विहिरीत दाेन दिवसांपासून या पुराव्यांची शाेधाशाेध सुरू केली आहे. विहिरीत माेठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. शनिवारपासून या पाण्याचा उपसा केला जात आहे, मात्र विहिरीला प्रचंड पाझर असल्याने रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण पाणी उपसा करणे शक्य झाले नाही. परिणामी पुरावे अद्याप पाेलिसांच्या हाती लागू शकले नाहीत.

हत्येनंतर मारेकरी साेशल मीडियावर सक्रिय
प्रा. शिंदे यांची हत्या पहाटे तीनच्या सुमारास झाली. हत्येनंतर मारेकरी सोशल मीडियावर सक्रिय होता, अशी माहिती तांत्रिक तपासात समोर येत आहे. गाढ झोपेतील शिंदेंच्या डोक्यात मारेकऱ्याने डंबेल्स मारले. त्यातच शिंदे हे गतप्राण झाले. पण जिवंत असल्याची भीती वाटल्यामुळे मारेकऱ्याने चाकू, कटरने गळ्यासह त्यांच्या हातांच्या नसा, कान कापला. हत्येनंतर आसपासचे रक्त व आपल्या अंगावरील रक्त आराेपीने टॉवेलने पुसले होते. डंबेल्स, रक्ताने माखलेला चाकू आणि कटर टॉवेलसह विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

बातम्या आणखी आहेत...