आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण:मारेकरी गजाआड, हत्येचे कारणही सर्वांसमोर, तरीही पूर्ण उलगडा नाहीच

औरंगाबाद / श्रीकांत सराफ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे, तर पूर्ण राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात प्रचंड वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा भयानक पद्धतीने खून झाला. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपासून सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली. उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा असेच वाटले. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही.

शिंदेंना चाकूने भोसकले नाही तर त्यांचा गळा चिरला, दोन्ही हातांच्या नसा कापण्यात आल्या. हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे या दिशेने चर्चा सुरू झाली. प्रा. शिंदे देखणे, उमदे, लोकप्रिय हायप्रोफाइल व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक. त्यामुळे घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा फार झाले तर सायंकाळी मारेकरी जेरबंद होणार अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ठोस पुरावेच नव्हते. मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारण्यात आले होते. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हते. शिंदेंशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. रात्री बारानंतर घरात कोण आले आणि बाहेर पडले असेही दिसत नव्हते. मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती सापडत नव्हती. त्यामुळे मारेकरी समोर दिसत होता. त्याचा वावर, त्याचे बोलणे, खून होण्यापूर्वी त्याने वापरलेला मोबाइल डेटा हे सारे त्याच्या दिशेने जात असले तरी त्याच्याभोवती घेराबंदी करणे पोलिसांना मुश्कील होत गेले. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एसआयटी स्थापन झाली. काही महिला अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली. चारही बाजूंनी हलकल्लोळ केल्यावर निकटवर्तीय अल्पवयीन मुलाने हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहिरीत टाकल्याची कबुली दिली आणि शिंदेंना का मारले याचेही एक कारण सांगितले.

कुटुंबाविषयी नात्याचे प्रश्न अनुत्तरित : अनेक तास विहिरीतील पाणी, कचरा उपसून हत्यारे काढली. मग ही घटना कशी आणि का घडली याचा उलगडा १८ ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसांनी केला. तरीही पूर्ण उलगडा झालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कारण प्रा. शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना कसे कळाले नाही? कळाले तर त्यांनी त्याला रोखले का नाही? वडील रक्ताच्या थारोळ्यात असताना झोपेतील आईला न उ‌ठवता मुले रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर कशी पडू शकतात? प्रा. शिंदे यांच्या आई-वडिलांनी याबद्दल नेमकी काय माहिती दिली? मुलीविषयी शिंदेंची विचित्र वागणूक होती काय? शिंदे कुटुंबातील नाते कसे होते? याविषयी उलटसुलट माहिती येत आहे. त्याची ठोस उत्तरे उलगड्यातून मिळत नाहीत.

सोशल मीडियावरील उलटसुलट चर्चा चिंताजनक
कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होताच जोडीदाराचा नवा चेहरा दिसल्याचे शेकडो पती-पत्नीला वाटू लागले. त्यातूनही काही दुरावलेले संबंध जुळून आले. धाडस दाखवून अनेकांनी स्वत:च्या खासगी आयुष्याची गाळाने भरलेली विहीर उपसली. कुटुंब हीच खरी संपत्ती. प्रामाणिकपणे नाती जपली तरच जीवन आनंदी ठरते याचा शोध त्यांना लागला. अशी विहीर उपसण्याची आणखी किती जणांची तयारी आहे, हा प्रा. शिंदे प्रकरणाने समाजासमोर उभा केलेला खरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...